सविस्तर प्रकल्प आराखडा लवकरच; महामेट्रोचा महापालिकेशी पत्रव्यवहार

मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू होऊन जेमतेम वर्ष होत नाही तोच मेट्रो मार्गाच्या विस्तारीकरणाला चालना मिळाली आहे. मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या दोन्ही मार्गिकांचे काम सुरू असतानाच मेट्रो थेट कात्रजपर्यंत नेण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. स्वारगेट ते कात्रज हा मेट्रो मार्ग सुरू करण्यासंदर्भात महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनशी (महामेट्रो) महापालिकेकडून पत्रव्यवहार करण्यात आला असून या मार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट-डीपीआर) तयार करण्याबाबत महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. डीपीआर करण्यासाठीची रक्कमही महापालिकेकडून देण्यात येणार आहे.

सार्वजनिक वाहतुकीचे सक्षमीकरण करण्यासाठी मेट्रोचा पर्याय पुढे आला. मात्र प्रत्यक्ष काम सुरू होण्यास आठ वर्षे लागली. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात मेट्रोच्या कामाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आणि वनाज ते रामवाडी तसेच स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या दोन्ही मार्गिकांचे काम टप्प्याटप्पाने सुरू झाले. हे काम सुरू होताच मेट्रोच्या विस्तारीकरणाची मागणीही लोकप्रतिनिधींकडून सुरू झाली होती. या पाश्र्वभूमीवर स्वारगेट ते कात्रज हा मेट्रो मार्ग तयार करण्यात यावा, यासाठी सभागृहनेता श्रीनाथ भिमाले यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. डिसेंबर महिन्यात पालकमंत्री गिरीश बापट आणि महापालिकेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी महामेट्रोच्या अधिकाऱ्यांबरोबरच या संदर्भात चर्चाही केली होती. त्या वेळी मेट्रो मार्गाचे विस्तारीकरण

करण्यास महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनीही सकारात्मकता दर्शविली होती.

स्वारगेट-कात्रज मार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट-डीपीआर) तयार करावा लागणार आहे.

त्यासाठी साठ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी तीस लाख रुपये देण्याची तयारी महापालिकेची तयारी दर्शविण्यात आली होती. तर या मार्गाच्या कामासाठी तीनशे कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तीनशे कोटींपैकी पन्नास टक्के रक्कम महापालिकेने देण्यासंदर्भात चर्चा झाली असून राज्य शासनाकडून उर्वरित रक्कम मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचेही आणि एकूण कामाच्या खर्चासाठी अंदाजपत्रकातही आवश्यक ती तरतूद करण्यासंदर्भात या चर्चेत निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार डीपीआर करण्याचा खर्च महापालिका प्रशासन करणार आहे.

पत्र महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांना दिले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये मेट्रोमार्गाच्या विस्तारीकरणाला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

वाहतूक कोंडीवर उतारा

स्वारगेट ते कात्रज या मार्गावर बीआरटी मार्ग असून वाढती वाहने आणि त्या तुलनेत अरुंद असलेल्या रस्त्यांमुळे या भागात सातत्याने वाहतूक कोंडी होत असते. हा मार्ग ५.५ किलोमीटर लांबीचा असून स्वारगेट चौकात महामेट्रोकडून मिश्रवहन केंद्र (मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट हब) उभारण्यात येणार आहे.

पाठपुराव्याला यश

  • कात्रज-स्वारगेट मेट्रो मार्ग व्हावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. त्याला यश आले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली होती. या मार्गासाठीचा सविस्तर प्रकल्प आराखडा लवकरात लवकर तयार करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे सभागृहनेता श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.
  • मेट्रोचा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या रकमेची अंदाजपत्रकात तरतूद करण्यात येईल. तसेच या रकमेची आवश्यकता तातडीने असेल तर ही रक्कम उपलब्ध करून दिली जाईल, असे स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.