स्वीडिश कंपन्यांना गुंतवणूक करण्यासाठी पुणे हे भारतातील महत्त्वाचे उद्योग केंद्र असल्याचे मत स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लोफव्हेन यांनी रविवारी व्यक्त केले. भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’मध्ये स्वीडन योगदान देईल, पण त्याचबरोबरीने ‘मेक फॉर इंडिया’ आणि ‘ग्रीन अँड क्लीन इंडिया’मध्ये सहयोग देण्यास आम्ही उत्सुक असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
दोन दिवसांच्या भारतभेटीवर आलेल्या लोफव्हेन यांनी रविवारी चाकण औद्योगिक वसाहतीमधील टेट्रा पॅक आणि एरिक्सन या कंपन्यांना भेट दिली. त्या दरम्यान त्यांनी संवाद साधला. स्वीडनचे भारतातील राजदूत हॅराल्ड सॅण्डबर्ग, महाराष्ट्र-गोवा आणि गुजरात या राज्यांसाठीच्या वाणिज्य दूत फ्रेडरिका ऑर्नब्रन्ट, स्वीडिश चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष आणि टेट्रा पॅक कंपनीच्या दक्षिण आशिया विभागाचे व्यवस्थापकीय संचालक कन्दर्प सिंग या वेळी उपस्थित होते.
भारत सरकारने हाती घेतलेल्या ‘मेक इन इंडिया’मध्ये सहभागी होण्यास स्वीडनला अतिशय आनंद होत आहे. यामुळे दोन्ही देशांतील परस्पर सहकार्यामध्ये वाढ होण्याबरोबरच दोन्ही देशांतील संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास व्यक्त करून लोफव्हेन म्हणाले, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेंतर्गत उद्योगांना सहजतेने आणि कमीतकमी वेळात परवाने उपलब्ध होण्यासाठी भारत सरकारने उचललेली पावले स्वागतार्ह आहेत. नावीन्यपूर्ण उद्योग, नव्या व्यवसायांची स्थापना आणि नवीन कल्पनांना बळ देण्यासाठी प्रोत्साहन दिल्याने भारताचा गतीने आणि शाश्वत विकास होण्यास मदत होईल.
स्वीडनच्या अनेक कंपन्या भारतामध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक असल्याने येथे मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक होईल. मुंबईपेक्षाही पुणे हे स्वीडन कंपन्यांसाठी महत्त्वाचे उद्योग केंद्र आहे. टेट्रा पॅक कंपनीचा स्वीडनबाहेरील मोठा प्रकल्प चाकण येथे आहे. पॅकिंग साधनांमुळे दूध आणि अन्य अन्नपदार्थ भारतासारख्या मोठय़ा देशातील दुर्गम भागामध्ये पोहोचविण्याचे समाजाला उपयुक्त काम होत आहे, असे सांगून लोफव्हेन म्हणाले, ‘डिजिटल इंडिया’ मोहिमेमध्ये एरिक्सन कंपनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. या प्रकल्पामध्ये २२ हजार कामगारांना रोजगार दिला आहे. यामध्ये २जी, ३जी आणि ४जी तंत्रज्ञानाची सध्याची स्थिती तसेच भावी उत्पादनांचा कंपनीचा मानस असून, त्यात रेडिओ आणि मायक्रोवेव्ह यांचाही अंतर्भाव आहे.