गेल्या अनेक वर्षांपासून शहरात मोठय़ा प्रमाणावर आढळून येणाऱ्या स्वाइन फ्लू या आजाराचे रुग्ण २०१९ मध्ये निम्म्याहून घटल्याचे यंदा पाहायला मिळाले. सन २०१९ मध्ये शहर आणि परिसरात १७५ रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे दिसून आले. ही संख्या गेल्या काही वर्षांच्या तुलनेत नियंत्रणात असल्याचे चित्र आहे.

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या नोंदींनुसार २०१७ मध्ये शहरात स्वाइन फ्लूचे ७०३ रुग्ण आढळले होते. त्यांपैकी ५६२ रुग्ण या आजारातून पूर्ण बरे झाले. त्या वर्षी तब्बल नऊ लाख एक हजार ६२७ रुग्णांमध्ये स्वाइन फ्लू सदृश लक्षणे आढळल्याने प्राथमिक तपासणी करण्यात आली होती. त्यांपैकी २६ हजार रुग्णांना टॅमिफ्लू हे औषध देण्यात आले. तीन हजार २२६ रुग्णांच्या थुंकीचे नमुने प्रयोगशाळेतून तपासून घेण्यात आले. त्यांपैकी ७०३ रुग्णांना स्वाइन फ्लू झाल्याचे निदर्शनास आले.

सन २०१८ मध्ये नऊ लाख ५३ हजार ५५३ रुग्णांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. १७ हजार ४१४ रुग्णांना टॅमिफ्लू देण्यात आले. दोन हजार ६२५ रुग्णांच्या थुंकीचे नमुने तपासण्यात आले. त्यांपैकी ५९२ रुग्णांना स्वाइन फ्लूचे निदान झाले.सन २०१९ मध्ये दहा लाखांहून अधिक रुग्णांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. त्यांपैकी १७ हजार ४०४ रुग्णांना टॅमिफ्लू देण्यात आले. १९ हजार ९९८ रुग्णांच्या थुंकीचे नमुने तपासण्यात आले. त्यातील १७५ रुग्णांना स्वाइन फ्लूचे निदान झाले. गेल्या तीन वर्षांची आकडेवारी पहाता, स्वाइन फ्लूची लागण झालेल्या रुग्णांचे प्रमाण आटोक्यात आल्याचे चित्र दिसून आले आहे.

जनरल फिजिशियन डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, थंडीचे महिने सुरू झाल्यानंतर देखील स्वाइन फ्लूसाठी पोषक हवामान २०१९ मध्ये दिसले नाही, त्यामुळे त्याच्या जंतूची वाढ होण्याचा वेग थांबला हे यातील प्रमुख कारण आहे. त्याचबरोबर स्वाइन फ्लूची लक्षणे दिसल्यास पहिल्या अठ्ठेचाळीस तासांत देणे आवश्यक असलेल्या टॅमिफ्लूची उपलब्धता वाढली. त्यामुळे आजाराच्या प्राथमिक टप्प्यातच त्यावर नियंत्रण आले. शिवाय नागरिक देखील जागरूक झाल्यामुळे सर्दी, खोकला, ताप या दुखण्याला अंगावर न काढण्याची सजगता निर्माण झाली आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणून २०१९ मध्ये स्वाइन फ्लूचे रुग्ण लक्षणीय रीत्या घटले आहेत, मात्र त्याचा प्रसार हा मुख्यत हवामानावर अवलंबून असल्यामुळे नागरिकांनी गाफील न राहाणे योग्य ठरेल.

काय खबरदारी घ्यावी

ताप, सर्दी, खोकला, श्वासोच्छवासाला त्रास अशी लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

डॉक्टरांनी टॅमिफ्लू हे औषध लिहून दिले असता त्याचा डोस पूर्ण करावा.

संपूर्ण विश्रांती घ्यावी, भरपूर पाणी प्यावे.

फ्लू सदृश लक्षणे दिसल्यास गरम पाण्याची वाफ घ्यावी.