पिंपरी- चिंचवडमध्ये स्वाइन फ्लूमुळे दोन दिवसात दोन जणांचा मृत्यू झाला असून गेल्या ११ दिवसात स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा पाचवर पोहोचला आहे.

पिंपरी- चिंचवडमध्ये ऑगस्टमध्ये स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढला असून गेल्या अकरा दिवसात पाच जणांचा मृत्यू झाला. आकुर्डीच्या ५६ वर्षीय पुरुषाचा अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यांच्यावर पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

स्वाइन फ्लूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना डॉक्टरांनी सूचना केल्या आहेत. सर्दी, खोकला, ताप असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, त्यामुळे पुढील उपचार घेता येतात, असे आवाहन करण्यात आले आहे.

जानेवारी ते डिसेंबर २०१७ या कालावधीत ६१ जणांचा स्वाइन फ्लूने बळी घेतला होता. सद्यस्थितीला एकूण ८ जण स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर शहरातील वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील तीन जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. परंतु गेल्या काही दिवसात स्वाईन फ्ल्यूचा प्रादुर्भाव वाढला असून महानगर पालिका प्रशासन या वर नियंत्रण आणण्यास अपयशी ठरत आहेत.