मोर्चाच्या पाश्र्वभूमीवर शिक्षकांना कानपिचक्या

शिक्षण खात्यातील विविध निर्णयांवरून शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना समाजमाध्यमांवर झोडपून काढण्याचे सत्र सुरू असतानाच अशैक्षणिक कामांच्या वाढत्या व्यापाला विरोध करण्यासाठी शनिवारी शिक्षणमंत्र्यांच्या विरोधात राज्यभरात मोर्चे काढण्यात आले. याचा संदर्भ देत तावडे यांनी शिक्षकांना कानपिचक्याही दिल्या. त्यामुळे व्हॉट्स अ‍ॅपवरील संदेशांचा त्यांनी घेतलेल्या धसक्याचा प्रत्यय आला. ‘कितीतरी शिक्षक वर्गात जात नाहीत, अनेक शिक्षक एजंटगिरी करतात, जमीन खरेदी विक्रीचा धंदा करतात, सर्वाची नावासह आकडेवारी आपल्याकडे आहे. आधार जोडणीमुळे खोटी पटसंख्या उघड होऊन अतिरिक्त शिक्षकांना बाहेर जावे लागेल’, असेही ते म्हणाले.

पिंपरी पालिकेच्या दोन महिने उशिरा झालेल्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात तावडे यांच्या हस्ते शहरातील गुणवंत शिक्षक व आदर्श शाळांचा सत्कार करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते. इंग्रजी शाळांचे आव्हान, शाळासिद्धी, ऑनलाईन काम, बदल्या, आधारकार्ड जोडणी, खोटी पटसंख्या, अतिरिक्त शिक्षक, सरल, सेल्फीच्या निर्णयाचा काढलेला वेगळा अर्थ, शाळाबाह्य़ मुले, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियान अशा विविध मुद्दय़ांवर शनिवारच्या मोर्चाच्या पाश्र्वभूमीवर तावडे यांनी आपली भूमिका मांडली.

ते म्हणाले,की शिक्षकांकडून खूपच अपेक्षा केल्या जातात, असे शिक्षक संघटना म्हणू शकतात. शिक्षकांनो, तुम्ही साने गुरूजी व्हा, असे आवाहन मी केले, तर तुम्ही लालबहादूर शास्त्री होऊन दाखवा, असे प्रत्युत्तरात ते म्हणू लागतील. शिक्षकांनी कालच्या मोर्चांमधून आपल्या भावना तीव्रपणे व्यक्त केल्या. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी, शाळांचे निकाल चांगले लागावेत, अशी शिक्षणमंत्री म्हणून अपेक्षा करणे चुकीचे आहे का? तरीही आपल्या विरोधात मोर्चे काढले गेले, विचित्र घोषणा देण्यात आल्या. चांगल्या शिक्षणासाठी शिक्षकांच्या वेतनावर ४७ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक आपण करतो. मग, चांगले शिक्षण देणे ही आपली जबाबदारी नाही का? नंदूरबार, धुळ्यातील शाळांचे निकाल उत्तम लागतात, पुण्यात तसे का होत नाही?

सेल्फीच्या निर्णयात काहीच चुकीचे नव्हते. मात्र, दिशाभूल करणारे संदेश व्हॉटस अ‍ॅपवर पसरविण्यात आले. चांगले काही करायचे नाही का? वाढते शहरीकरण, इंगजी शाळांचे स्तोम पाहता विद्यार्थी टिकले पाहिजेत. शिक्षकांवर विश्वास आहे. त्यांच्याकडूनच समाजाला अपेक्षा आहेत. शिक्षकांचा सन्मान वाढला पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे. मात्र, तरीही आपल्या भाषणाचे व त्यावरील प्रतिक्रियांचे संदेश तयार केले जातात, ते प्रसारित केले जातात. हा नेहमीचा उद्योग झाला, हे मला माहिती आहे. आज थोडेफार तिखट बोललो असेल, तर दिलगिरी व्यक्त करतो, असे सांगतानाच, हे भाषण अनेकांनी रेकॉर्ड केले आहे. आतापर्यंत व्हॉटस अ‍ॅपवर ते पसरलेही असेल, असे ते म्हणाले. महापौर नितीन काळजे, खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, उपमहापौर शैलजा मोरे, पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, व्याख्याते राहुल सोलापूरकर आदी व्यासपीठावर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयुक्त हर्डीकर यांनी केले. अविनाश वाळुंज यांनी सूत्रसंचालन केले.