जिल्ह्य़ातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारातच जाण्याची शक्यता असून काही शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्याचे पगार अजूनही मिळालेले नाहीत. जिल्ह्य़ातील अतिरिक्त शिक्षकांना तर गेल्या तीन महिन्यांचे पगार अजून मिळालेले नाहीत.
शालार्थ प्रणाली मध्ये डेटा भरताना अडचणी येत असल्यामुळे शिक्षकांचे पगार उशिरा होत आहेत. ऑक्टोबरचे पगार दिवाळीपूर्वी शिक्षकांना मिळावेत म्हणून ते याच महिन्यामध्ये देण्याचे आदेश शासनाने काढले आहेत. मात्र, जिल्ह्य़ातील अनेक शिक्षकांचे ऑगस्ट महिन्याचे पगार हे या महिन्यात झाले आहेत. सप्टेंबर महिन्याचे पगार अजूनही झालेले नाहीत. शालार्थनुसार आधीच्या महिन्याचे पगार झाल्याशिवाय पुढच्या महिन्याचे पगार होत नाहीत. त्यामुळे ऑक्टोबरचा पगार दिवाळीपूर्वी मिळणार का अशी साशंकता शिक्षक आणि कर्मचाऱ्यांमध्ये आहे.
जिल्ह्य़ातील अतिरिक्त झालेल्या शिक्षकांना तर गेले तीन महिने पगार मिळालेले नाहीत. या शिक्षकांचे ज्या ठिकाणी समायोजन करण्यात आले आहे, त्या ठिकाणी अजूनही काही शिक्षकांना सामावून घेण्यात आलेले नाही. या शिक्षकांना शालार्थमध्ये स्थानच नसल्यामुळे त्यांचे पगार अडले आहेत. दिवाळीपूर्वी पगार मिळावेत, अशी मागणी या शिक्षकांकडून होत आहे.