करोनाकाळात सलग दोन अष्टहजारी शिखर चढाईची कामगिरी

पुणे : जगभर थैमान घालणाऱ्या करोनाचा शिरकाव जगातील सर्वोच्च शिखर चढाईच्या वाटेवर झालेला असताना या दहशतीवर मात करत मानसिक आणि शारीरिक कणखरतेचे दर्शन घडवत पुण्याच्या ‘गिरिप्रेमी’ संस्थेच्या जितेंद्र गवारे या गिर्यारोहकाने बुधवारी सकाळी सर्वोच्च एव्हरेस्ट शिखरावर आपले पाय उमटवले.

गिरिप्रेमीच्या गिर्यारोहकांच्या संघाने नुकतेच अन्नपूर्णा शिखर सर केले. या संघातील गवारे यांनी या यशानंतर लगेच सर्वोच्च शिखर ‘एव्हरेस्ट’साठीही चढाई सुरू केली होती.  यासाठी त्यांना ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे, एव्हरेस्टवीर भूषण हर्षे आणि डॉ. समित मांदळे यांचे मार्गदर्शन लाभले.

दरम्यान, जगभर थैमान घालणाऱ्या करोनाचा शिरकाव एव्हरेस्टच्या तळावरही काही दिवसांपूर्वीच झाल्याने यंदाच्या या चढाईतून अनेक गिर्यारोहकांनी माघार घेतली होती. या पार्श्वभूमीवर भारताच्या गवारे यांनी करोनाच्या या दहशतीमध्येही मानसिक आणि शारीरिक कणखरतेचे दर्शन घडवत हे यश संपादन केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. गवारे यांनी यापूर्वी कांचनजुंगा, अन्नपूर्णा आणि अमा दब्लम या उत्तुंग हिमशिखरांवर यशस्वी चढाई केलेली आहे.

जितेंद्र गवारे यांची कामगिरी…

पुण्यातील वडगाव शेरी येथील जितेंद्र गवारे यांनी नुकतेच जगातील सर्वोच्च दहावे अन्नपूर्णा शिखरावरही यशस्वी चढाई केली आहे. याद्वारे आठ हजार मीटरपेक्षा उंच असलेल्या दोन शिखरांवर पाठोपाठ चढाई करण्याची कामगिरी त्यांनी रचली आहे.

महत्त्व काय?

आठ हजार मीटरपेक्षा उंच असलेली शिखरे ही मानवी शरीरासाठी आव्हानात्मक असतात. अशा वेळी लगोलग अशा दोन मोहिमांमध्ये सहभाग घेत त्यात यश संपादन करण्याची कामगिरी गवारे यांनी केली आहे.

एकीकडे मर्यादित साधने, अपुरा निधी यावर मात करत मोहिमा काढत असतानाच करोनासारख्या भयसंकटाचा सामना करत जितेंद्र गवारे याने पाठोपाठ दोन अष्टहजारी शिखर चढाईचे मिळवलेले यश लक्षणीय आहे. हे यश महाराष्ट्रातील गिर्यारोहणाला चालना देणारे आहे. – उमेश झिरपे