औंधच्या सिनेपोलीस चित्रपटगृहातील प्रकार 

पिंपरी : भाई चित्रपटाचा पहिला खेळ ऐन रंगात आलेला असताना अचानक तांत्रिक बिघाड झाला आणि  प्रेक्षकांचा रसभंग झाला. दुरुस्तीत यश येत नसल्याने व्यवस्थापनाने दिलगिरी व्यक्त केली. प्रेक्षकांनी शांतता राखून सहकार्य करावे, या हेतूने व्यवस्थापनाने प्रेक्षागृहातच विनामूल्य चहा, कॉफीपानाचीही व्यवस्था केली. औंधच्या सिनेपोलीस चित्रपटगृहात शुक्रवारी सकाळी हा प्रकार घडला.

वेस्टएन्ड मॉलमध्ये सिनेपोलीसमध्ये सकाळी साडेनऊ वाजता भाई चित्रपटाचा पहिला खेळ होता. पावणेदहाला तो सुरू झाला. चित्रपट सुरू होऊन अर्धा तास झालेला असताना तांत्रिक अडचण उद्भवली. पडद्यावरील चित्र आणि संवाद यांच्यात ताळमेळ नसल्याचे प्रेक्षकांना जाणवले. काहींनी ही बाब  व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर बिघाड दुरुस्तीचे बरेच प्रयत्न झाले. मात्र, त्यात यश येत नव्हते.

चित्रपट सुरुवातीपासून पुन्हा सुरू करण्यात आला. तरीही त्याच प्रसंगाला तोच बिघाड होत होता. त्यामुळे प्रेक्षकांचा हिरमोड झाला. अखेर, चित्रपट काही काळ थांबवण्यात आला. व्यवस्थापनाने दिलगिरी व्यक्त केली. प्रेक्षकांनी गोंधळ घालू नये, या भावनेतून आतमध्ये प्रत्येकाला कॉफी किंवा थंड पेय आणून देण्यात आले. अखेर, बऱ्याच प्रयत्नांनंतर बिघाड दूर करण्यात यश आले. झालेला विलंब भरून काढण्यासाठी १२ मिनिटांसाठी असलेले मध्यंतर अवघ्या दोन मिनिटांमध्ये उरकण्यात आले. जाहिराती वगळण्यात आल्या. त्यानंतर, सुरू झालेला चित्रपट व्यवस्थित पार पडल्याने प्रेक्षकांनी तसेच व्यवस्थापनाने सुटकेचा नि:श्वास सोडला.