मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता

राज्याच्या सर्वच भागांमध्ये कमाल तापमानात वाढ झाल्याने उन्हाच्या झळा तीव्र होत आहेत. उन्हाची काहिली आणखी वाढत जाईल, असे हवामान विभागातील सूत्रांनी सांगितले. दरम्यान, मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, मराठवाडय़ातील नांदेड आणि विदर्भातील गडचिरोली, वाशीम, यवतमाळ, अकोला, बुलडाणा, चंद्रपूर जिल्ह्य़ांत अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

राज्यात गेल्या आठवडय़ापासून उन्हाची तीव्रता वाढली असून, कमाल तापमानामध्ये सरासरीच्या तुलनेत वाढ होताना दिसत आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रासह कोकणातही कमाल तापमानात वाढ होत आहे. विदर्भातील अमरावती येथे रविवारी राज्यातील उच्चांकी ४१ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

कमाल तापमान (अंश से.) सांताक्रुझ ३६.७, अलिबाग ३२.३, रत्नागिरी ३१.०, पुणे ३८.४, नगर ३८.२, जळगाव ३९.६, कोल्हापूर ३८.९, महाबळेश्वर ३४.६, मालेगाव ३९.२, नाशिक ३७.६, सांगली ४०.०, सातारा ३८.६, सोलापूर ४०.८, नांदेड ३९.५, उस्मानाबाद ३८.६, बीड ४०.४, औरंगाबाद ३८.२, परभणी ४०.३,  अमरावती ४१.०, अकोला ३९.६, बुलडाणा ३६.५, ब्रम्हपुरी ३९.५, चंद्रपूर ३९.०, गोंदिया ३५.६, नागपूर ३७.९, वाशिम ३७.४, वर्धा ३९.४, यवतमाळ ३९.०.