कोरडय़ा हवामानाच्या स्थितीमुळे राज्यातील तापमानात झपाटय़ाने वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. विदर्भात नागपूरसह विविध ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. या भागात उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दुसरीकडे नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांना सध्या तरी चालना नसल्याने ते अंदमानाच्या समुद्रातच रेंगाळले आहेत.

मध्य प्रदेश ते तमिळनाडूपर्यंत कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात गेल्या आठवडय़ात पावसाळी स्थिती होती. अनेक भागात पूर्वमोसमी पावसाने वादळासह हजेरी लावली. त्यानंतर हळूहळू निरभ्र कोरडय़ा हवामानाची स्थिती निर्माण झाली. त्याच काळात म्हणजे १७ मे रोजी मोसमी वारे अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांवर दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. या दरम्यान बंगालच्या उपसागरामध्ये अम्फान चक्रीवादळ निर्माण झाले होते. त्याने मोसमी वाऱ्यांना काहीशी चालना दिली. चक्रीवादळ उत्तरेच्या दिशेने जाऊन पश्चिम बंगाल, बांग्लादेशाच्या किनारपट्टीवर धडकले. त्यानंतर त्याची तीव्रता कमी झाली. या पाच दिवसांच्या काळात मोसमी वारे अंदमानच्या समुद्रातच रेंगाळले आहेत.  हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानसार २२ ते २६ मे या कालावधीत राज्यात सर्वत्र कोरडय़ा हवामानाची स्थिती राहणार आहे. त्यामुळे दिवसाच्या तापमानात वाढ होऊन उन्हाचा चटका वाढणार आहे. २५ मेपर्यंत विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.