दहशतवाद, नक्षलवाद या प्रश्नांबरोबरच कुप्रशासन ही देखील एक गंभीर समस्या आहे, असे मत एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले यांनी गुरुवारी व्यक्त केले. यशाने आकाशामध्ये विहरताना पाय जमिनीवर ठेवा. जनेतला विसरू नका, असेही ते म्हणाले.
पुणे मराठी ग्रंथालयातर्फे गोखले यांच्या हस्ते अतुल कहाते यांच्या ‘रहस्य वंशवेलीचे’ या पुस्तकास स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार आणि सुधा रिसबुड यांच्या ‘भारतीय स्त्री-एक मीमांसा’ या पुस्तकास चेतना पुरस्कार प्रदान करण्यात आला. एमपीएससी, यूपीएससी परीक्षेत यश संपादन केलेल्या अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष मुकुंद अनगळ आणि कार्यवाह हेमंत कुलकर्णी या प्रसंगी व्यासपीठावर होते.
गोखले म्हणाले, सध्याच्या काळातील मुले वाहावत चालली असल्याने समाजामध्ये अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे संस्कार करण्यामध्ये आई कमी पडत आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो.
रिसबुड म्हणाल्या, राज्यकर्त्यांच्या नावाने समाज ओळखला जातो हे खरे असले, तरी प्रथा आणि उद्यमशीलतेचे वहन त्या समाजातील स्त्रिया करीत असतात. काळानुसार स्त्रियांचे समाजातील स्थान गौण झाले. ४१ कोटी स्त्रिया ग्रामीण भागात वास्तव्यास असल्याने राष्ट्राची पुनर्रचना करताना ग्रामीण स्त्रियांच्या विकासाला चालना द्यावी लागेल.
कहाते म्हणाले, कुतूहल आणि विषय समजून घेतला, तर लेखन सहजतेने होते. मराठी ललित साहित्य समृद्ध असले, तरी विज्ञान, तंत्रज्ञान या आधुनिक विषयांवर फारसे लेखन झालेले नाही. या समुद्रातील एक थेंब होऊ शकलो, तरी भाग्यवान समजेन. धनंजय बर्वे यांनी सूत्रसंचालन केले.