दिल्लीमधील निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमात पिंपरी-चिंचवड शहरातील ३२ जण होते. त्यानंतर शोधाशोध करून २२ जणांना क्वारंटाइन करण्यात पोलीस आणि आरोग्य विभागाला यश आले. यांच्यातील काही जणांचा रिपोर्ट आला असून ६ जण निगेटिव्ह असल्याचे समोर आले आहे. त्यांना लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार असून होम क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दिल्लीमधील निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमात शहरातील ३२ जण सहभागी झाले होते. तेथील कार्यक्रमात काही जणांना करोना झाल्याची माहिती असून महाराष्ट्रातील अनेक जण त्या ठिकाणी गेलेले होते. त्यामध्ये पिंपरी-चिंचवडमधील एकूण ३२ जण गेले असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. त्यापैकी २२ जणांना शोधण्यात यश आले असून त्यांच्यावर महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या घशाचे द्रव्य हे पुण्यातील एनआयव्हीला आज सकाळी पाठवण्यात आले असून त्यातील सहा जनांचे टेस्ट ही निगेटिव्ह आली आहे. त्यांना लवकरच घरी सोडण्यात येणार असून त्यांना होम क्वारंटाइनमधे ठेवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उर्वरित व्यक्तींचा रिपोर्ट उद्या येणार आहे.