03 June 2020

News Flash

दहावी, बारावीच्या निकालाचा ‘फुगवटा’ कायम राहणार?

गेली काही वर्षे दहावी, बारावीच्या निकालाला येणारा ‘फुगवटा’ या वर्षीही कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले

लेखी परीक्षेत किमान गुण निश्चित करण्याचा प्रस्ताव शासनाने फेटाळला
गेली काही वर्षे दहावी, बारावीच्या निकालाला येणारा ‘फुगवटा’ या वर्षीही कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले असून लेखी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी किमान गुण निश्चित करण्याचा राज्य मंडळाचा प्रस्ताव शासनाने फेटाळला असल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षण प्रधान सचिव नंदकुमार यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना दिली. त्यातच क्रीडा गुणांचाही आधार विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
राज्य मंडळाने २० गुणांचे अंतर्गत मूल्यमापन आणि ८० गुणांची लेखी परीक्षा अशी गुणांची वर्गवारी केली. मात्र परीक्षेत उत्तीर्ण होण्याचा निकष बदललाच नाही. लेखी आणि तोंडी परीक्षेत मिळून ३५ गुण मिळवणेच विद्यार्थ्यांसाठी पुरेसे असते. त्यातही ग्रेस गुणांचा आधार असतो. त्यामुळे तोंडी परीक्षेत अगदी पैकीच्या पैकी गुण आणि लेखी परीक्षेत पाच-दहा गुण अधिक ग्रेस गुण असे गणित साधून दहावी-बारावीचे विद्यार्थी सहज उत्तीर्ण होतात. या पद्धतीमुळे गेली दोन वर्ष दहावी, बारावीच्या निकालाचे नवे नवे उच्चांक मिळत आहेत. त्यामुळे पुढील प्रवेशाची गणितेही दोन वर्षांपासून बदललेली आहेत.
निकालाच्या या फुगवटय़ाच्या पाश्र्वभूमीवर उत्तीर्ण होण्यासाठी लेखी परीक्षेत किमान गुणांचा निकष ठेवण्याची मागणी करण्यात येत होती. दहावी, बारावीच्या परीक्षा घेणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानेही याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. मात्र शासनाने तो प्रस्ताव फेटाळला आहे, अशी माहिती नंदकुमार यांनी माध्यमांशी बोलताना सोमवारी दिली.
‘राज्य मंडळाने पाठवलेला किमान गुणांचा प्रस्ताव हा आधीच्या शासनाने त्यांची मुदत संपत असताना घाईत घेतलेला निर्णय होता. मात्र या शासनाला तो योग्य वाटला नाही. त्यामुळे तो फेटाळण्यात आला,’ असेही शालेय शिक्षण प्रधान सचिव नंदकुमार यांनी सांगितले.

निकालाच्या विक्रमाचीच शक्यता
किमान गुणांचा निकष फेटाळल्यामुळे या वर्षीही दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल नवा विक्रम करण्याचीच शक्यता आहे. त्यातच क्रीडा गुणांचा आधारही विद्यार्थ्यांना मिळणार आहे. क्रीडा गुण देण्याचा निर्णयही या वर्षीपासून पुन्हा सुरू करण्यात आल्यामुळे अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण या वर्षी अधिकच घटणार आहे. त्यामुळे यंदा निकालात विक्रमांची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2015 12:11 am

Web Title: the government rejected the proposal to set minimum marks for written test in ssc hsc exam
टॅग Hsc Exam,Ssc,Ssc Exam
Next Stories
1 सलग सुट्टय़ांमुळे जेजुरीत भाविकांची प्रचंड गर्दी
2 कडक नियमांमुळे नेटच्या उमेदवारांची ‘परीक्षा’
3 ‘बँक डेव्हलपमेंट फंड’ निर्माण करण्याचा विचार – सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांचे सूतोवाच
Just Now!
X