News Flash

मुजोरी कायम!

दंडाची रक्कम जागेवर न स्विकारता नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविण्यात येतो.

(संग्रहित छायाचित्र)

आठ महिन्यांत २२ कोटींचा दंड वसूल करूनही कारवाईचा धाक नाही

पुण्यातील वाहनचालकांकडून वाहतुकीचे नियम मोडण्याचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत असली तरी नियमभंग करणारे वाहनचालक कारवाईला जुमानत नसल्याचे दिसून आले आहे. गेल्या आठ महिन्यांत बेशिस्त वाहनचालकांवर पोलिसांनी खटले दाखल करून २२ कोटी ५४ लाख ६२ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

वाहतूक पोलिसांनी गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे कारवाई सुरू केली. दंडाची रक्कम जागेवर न स्विकारता नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविण्यात येतो. त्यात नियमभंगाचा प्रकार आणि दंडाची रक्कम नमूद करण्यात येते तसेच चौकात नियमन करण्यासाठी थांबलेल्या वाहतूक पोलिसांकडे दंड जमा करण्यासाठी इपॉस यंत्रे देण्यात आली आहेत. या यंत्राद्वारे पोलीस नियमभंग करणाऱ्या वाहनचालकाकडून डेबिट कार्ड स्वाइप करून दंड स्वीकारतात. गेल्या पावणेदोन वर्षांत पोलिसांनी नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्याची मोहीम तीव्र केली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर करून कारवाई करण्यात येत आहे. चौकाचौकांत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असल्याची जाणीव असली तरी सिग्नल मोडून जाणे, पादचारी मार्गावर वाहने उभी करणे, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, ट्रीपल सीट वाहन चालवणे अशा प्रकारचे नियमभंग सर्रास होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने १ जानेवारी ते ३१ ऑगस्ट २०१८ या कालावधीत बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून २२ कोटी ५४ लाख ६२ हजार २५९ रुपये दंड वसूल केला आहे. सिग्नल मोडणाऱ्या वाहनचालकांकडून २ कोटी २० लाख ४९ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. वाहन परवाना न बाळगणाऱ्या वाहनचालकांकडून १ कोटी ९८ लाख २५ हजार ६०९ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. हेल्मेट परिधान न करणे, सम-विषम दिनांक न पाहता वाहने लावणे, वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने वाहने उभी करणे असे नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

१० लाख १८ हजार वाहनचालकांवर कारवाई

नियमभंगाचे सर्वाधिक प्रमाण झेब्रा क्रॉसिंगवर (पादचारी मार्ग) वाहने थांबवण्याचे असल्याचे निरीक्षण वाहतूक पोलिसांकडून नोंदविण्यात आले आहे. झेब्रा क्रॉसिंगवर वाहने थांबविणाऱ्या ३ लाख ३७ हजार ३८४ वाहनचालकांकडून ६ कोटी ७४ लाख ७६ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पोलिसांनी गेल्या आठ महिन्यांत १० लाख १८ हजार ५६० बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2018 3:56 am

Web Title: the number of vehicles moving by the drivers of pune is increasing significantly
Next Stories
1 ‘जन-गण’ सेवेचा शतकोत्तर सांस्कृतिक सोहळा
2 खाऊ खुशाल : नवलाखा लाडूवाले
3 मारेकऱ्यांकडून दोन वेळा डॉ. दाभोलकर यांचा पाठलाग
Just Now!
X