वरसगाव, पानशेत धरणांमधून पाण्याचा विसर्ग बंद

पुणे : खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस बुधवारी ओसरला. त्यामुळे वरसगाव आणि पानशेत धरणांमधून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग तूर्त थांबवण्यात आला आहे, तर खडकवासला धरणातून मुठा नदीत सायंकाळी ८५६ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. सध्या ही चारही धरणे १०० टक्के  भरली आहेत. बुधवारी सकाळपर्यंत टेमघर धरणक्षेत्रात २२ मिलिमीटर, वरसगाव आणि पानशेत धरणांच्या परिसरात प्रत्येकी १३ मि.मी., तर खडकवासला धरणक्षेत्रात अवघ्या एका मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. सकाळपर्यंत खडकवासला धरणातून मुठा नदीत ५१३६ क्युसेकने विसर्ग करण्यात आला. मात्र, दिवसभरात चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे वरसगाव आणि पानशेत धरणांमधून सुरू असलेला विसर्ग सायंकाळी पाच वाजता थांबवण्यात आला. मात्र, या दोन्ही धरणांमधून वीजनिर्मितीसाठी पाणी सोडण्यात येत आहे. खडकवासला धरणातून सुरू असलेला विसर्ग दुपारी तीन वाजता ३४२४ क्युसेक, तर सायंकाळनंतर ८५६ क्युसेकपर्यंत कमी करण्यात आला. मुठा उजव्या कालव्यातून ११५५ क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. टेमघर धरणातून ५९१ क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण परिसरात दिवसभरात दोन मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. या धरणातून दिवसभरात २४२० क्युसेकने पाणी सोडण्यात आले. सध्या डिंभे, कळमोडी, चासकमान, वडिवळे, आंद्रा, कासारसाई, गुंजवणी, भाटघर आणि वीर या धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्य़ाच्या सीमेवरील उजनी धरण परिसरात पाऊस नसला, तरी जिल्ह्य़ातील विविध धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने हे धरण ७४ टक्के  भरले आहे, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

प्रमुख धरणांमधील पाणीसाठा टीएमसीमध्ये, कंसात टक्क्यांमध्ये

टेमघर ३.७१ (१००), वरसगाव १२.८२ (१००), पानशेत १०.६५ (१००), खडकवासला १.९७ (१००), पवना ८.५१ (१००), भामा आसखेड ७.६० (९९.१५), डिंभे १२.४९ (१००), चासकमान ७.५७ (१००), गुंजवणी ३.६९ (१००), निरा देवघर ११.७३ (१००), भाटघर २३.५० (१००), वीर ९.४१ (१००) आणि उजनी ३९.८४ (७४.३७)