भाजपाध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीत भाजपाचा खासदार निवडूण येईल, असे विधान केले होते. यावर बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या, बारामतीतून कोणीतरी निवडून येईलच पण तो लोकशाही मार्गाने येईल, अशा खोचक शब्दांत त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

बारामती लोकसभा मतदारसंघातील मुलींना सायकल वाटपाच्या कार्यक्रमादरम्यान त्यांच्याशी संवाद साधला असता. खासदार सुप्रिया सुळे यांनी शाह आणि फडणवीस यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. सुळे म्हणाल्या, जिथं आपला खासदार नसतो तिथं आम्ही देखील आमचा उमेदवार निवडून येईल असेच म्हणतो. त्याप्रमाणे बारामतीत भाजपाचा खासदार होईल, असे अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस म्हणाले.

तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आमच्यावर एवढा रोष का आहे, हे समजत नाही. पण बारामतीत कोणीतरी विरोधात लढणार आहे. त्यामुळे लोकशाही योग्य ती व्यक्ती निवडून देईल, अशा खोचक शब्दांत भाजपाला टोला लगावताना आपल्याच विजयाचा त्यांनी विश्वासही व्यक्त केला.

विरोधकांच्या महायुतीला ‘महाठग’ अशी संभावना करणाऱ्या अमित शाहंच्या विधानाचा त्यांनी खरपूस समाचार घेतला. त्या म्हणाल्या, कोणीही व्यक्तीगत पातळीवर जाऊन बोलणे योग्य नाही, पातळी सोडून बोलणं हे दुर्देवी आहे. तसेच महाराष्ट्र राज्य सुसंस्कृत असून आम्ही पातळी सोडलेली नाही आणि सोडणारही नाही, असे त्या म्हणाल्या.