डोळ्यात तेल घालून देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या जवानांच्या पोलादी मनगटावर विद्यार्थिनींनी तयार केलेल्या राख्या बांधल्या जाणार आहेत. राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एन. एस. एस.) विद्यार्थिनींनी जवानांना राख्यांसमवेत शुभेच्छा संदेश पाठविले आहेत.

सीमेवरील जवानांना राखी पाठवून  अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमधील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थिनींनी बंधुप्रेमाचे अतूट नाते जपले. ‘सैनिक बांधवांच्या मनगटात अधिक बळ येऊ दे’अशी प्रार्थना करून विद्यार्थिनींनी राख्यांबरोबर शुभेच्छा संदेश पाठवले. विद्यार्थिनींनी पाठवलेल्या राख्या रवाना झाल्यानंतर जवानांकडून पत्राद्वारे परत मिळालेली पोहोच ही आमच्यासाठी अन्य भेटवस्तूपेक्षा अधिक अमूल्य ठेवा असल्याची भावना विद्यार्थिनींनी व्यक्त केली. या अभिनव उपक्रमामुळे जवान आणि विद्यार्थिनींमध्ये बहीण-भावाच्या प्रेमाचे अतूट नाते वृद्धिंगत झाले आहे. प्राचार्या वर्षां शर्मा आणि कार्यक्रम अधिकारी विनोदकुमार  बंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनीनी राख्या तयार केल्या. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप आणि सचिव सुनीता जगताप यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.