पुणेरी पाट्यांबाबत प्रसिद्ध असलेले पुणे शहर निवडणुकीच्या काळातील फ्लेक्सबाजीने चर्चेत आले होते. याची पुन्हा पुनरावृत्ती झाली असून पुणे महापालिकेच्या इमारतीसमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाने सरकारविरोधात केलेली फ्लेक्सबाजी केली आहे. ‘काही बोलायच नाही, सरकार पारदर्शक आहे,’ असे शब्द या फ्लेक्सवर लिहील्याने ते सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

‘नियोजनाचा अभाव अन् वाहतुकीचा बोजवारा…. वाहनचालक गुदमरतोय सुरक्षेचे तीन तेरा,’ ‘सत्ताधाऱ्यांची केली निराशा घोर, केवळ घोषणांचाच पाऊस आणि आश्वसनाचा जोर,’ ‘आरक्षणे बदलली डीपी फिरवला, बोलघेवड्या विकासवाल्याकडून विकास हरविला,’ असा मजकूर फ्लेक्सवर लिहिला आहे. याद्वारे त्यांनी सताधारी पक्षावर मार्मिक टीका केल्याचे बोले जात असून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचे हे फ्लेक्स लक्ष वेधून घेत आहेत.

आपल्या फ्लेक्सबाजीबाबत बोलताना नगरसेवक महेंद्र पठारे म्हणाले, केंद्रात-राज्यात आणि महापालिकेत सत्तेमध्ये येण्यापूर्वी भाजपने नागरिकांना अनेक आश्वसने दिली. मात्र यातील एकही आश्वासन पूर्ण झालेले नाही. याच्या निषेधार्थ मी हे फ्लेक्स लावले आहेत. यावेळी त्यांनी सरकारच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.