राज्यातील अनेक भागात आज मुसळधार पाऊस पडला असुन पुण्यात देखील वरूणराजाने दमदार हजेरी लावली. तर उद्या (शनिवार) देखील पुणे शहरात मुसळधार पाऊस पडणार आहे. तसेच, पुढील दोन ते तीन दिवस शहर आणि परिसरात दुपानंतर पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. तर आज दिवसभरात २५.५ मिमी एवढा पाऊस झाला आहे.

शहरात सकाळपासून संततधार पावसामुळे लक्ष्मी रस्ता, टिळक रोड, कुमठेकर रोड, सातारा रोड, पुणे- सातारा रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी पाहण्यास मिळाली. तसेच शहरात अनेक भागात मुसळधार पाऊस झाल्याने १० ते १२ ठिकाणी झाडं पडण्याच्या घटना देखील घडल्या.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला. खडकवासला धरण क्षेत्रात २८ मिमी ,पानशेत ७२ मिमी, वरसगाव ६६ मिमी आणि टेमघर ९७ मिमी असा पाऊस दिवसभरात धरण क्षेत्रात झाला आहे. ही समाधानाची बाब असून काही प्रमाणात तरी धरण साठ्यात वाढ झाली आहे.