गर्लफ्रेंड सोबत फिरण्यासाठी दुचाकी चोरणाऱ्या तिघांना गुन्हे शाखा (युनिट -५ ) कडून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ६ लाख रुपयांच्या १४ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. तर, हिमांशू सोळंकी (वय-२०), निखिल जाधव (वय-१९), आशिष जाधव (वय-२१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील निखिल संतोष जाधव हा सराईत गुन्हेगार आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही आरोपी हे मित्र असून गर्लफ्रेंडला फिरवण्यासाठी दुचाकी नसल्याने ते दुचाकी चोरत होते. यातील हिमांशू आणि आशिष हे महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत तर निखिल हा सराईत गुन्हेगार आहे. गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांना संबंधित आरोपी हे सोमाटने फाटा येथे दुचाकी घेऊन थांबले असल्याची माहिती मिळाली होती. तसेच, त्यांच्याकडील दुचाकी ही चोरीची असल्याचेही समजले होते. त्यानुसार पोलिसांकडून दोन पथक तयार करून सापळा रचण्यात आला. यानंतर मोठ्या शिताफीने संबंधित तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी केवळ गर्लफ्रेंडला फिरवण्यासाठी दुचाकी चोरत असल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून तब्बल १४ दुचाकी हस्तगत केल्या असून, त्यांच्या अटकेमुळे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यातील १२ गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.