गेले दहा वर्ष महाराष्ट्रासह कर्नाटकातील मंदिरात चोऱ्या करणाऱ्या टोळीला हिंजवडी पोलिसांनी जेरबंद केले. या टोळीविरुद्ध राज्यातील २१ पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले असून चोरटय़ांकडून तीन लाख ९६ हजारांचा माल जप्त करण्यात आला.
दीपक किसन पवार (वय ३७, रा. वाकड), प्रकाश किसन पवार (वय ४३, रा. काळेवाडी), महेंद्रसिंग शैतानसिंग राठोड (वय ३९, रा. काळेवाडी) आणि रवी जटासिंग सोनी (वय २२, रा. बेलठिकानगर, थेरगांव) अशी अटक केलेल्या चोरटय़ांची नावे आहेत. काळेवाडी परिसरात राहणारे चोरटे मंदिरातून चोरलेले दागिने उत्तर प्रदेशातील एका सराफ व्यावसायिकाला विकतात, अशी माहिती पोलीस कर्मचारी आशिष बोटके यांना मिळाली. पोलिसांनी पवार, राठोड, सोनी याला ताब्यात घेतले. तेव्हा त्यांच्याकडे मूर्ती सापडली तसेच पत्रे कापण्यासाठी लागणारी कात्री, पक्कड, हातोडी अशी हत्यारे मिळाली. तपासात या चौघांनी पालघर जिल्ह्य़ात असलेल्या शिरसाड गावातील जैन मंदिरातून मूर्ती चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी उत्तर प्रदेशातील इटावा बाजार येथून सराफ राजकुमार सोनी (वय ३७) याला अटक केली.
या टोळीने पालघर परिसर, शहापूर, सिन्नर, इगतपुरी, संगमनेर, हिवरे बाजार, भोसरी, लोणी काळभोर येथील मंदिरात चोऱ्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलीस आयुक्त के. के. पाठक, अतिरिक्त आयुक्त सी. एच. वाकडे, उपायुक्त बसवराज तेली, सहायक आयुक्त वैशाली जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण वायकर, पोलीस निरीक्षक अप्पसाहेब वाघमळे, विश्वजीत खुळे, सहायक निरीक्षक हेमंत पाटील, हवालदार राज केदारी, पुनाजी थोरवे, विवेक गायकवाड, सचिन उगले, आशिष बोटके, आतिक शेख, ज्ञानेश्वर मुळे, सतीश गायकवाड, नलीन येरुनकर यांनी ही कामगिरी केली.