News Flash

यंदा दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर केवळ पाच महिलांच्या उपस्थितीत अथर्वशीर्ष पठण

हजारोंच्या उपस्थितीची परंपरा यंदा खंडीत

पुणे : दरवर्षी हजारो महिलांच्या उपस्थितीत ऋषिपंचमीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर आयोजित करण्यात येत असलेला अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम यंदा केवळ पाचच महिल्यांच्या उपस्थितीत पार पडला.

यंदाचा गणेशोत्सव करोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाच्या सूचनांनुसार सर्वत्र साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे. गर्दी टाळून पूजाआर्चा देखील पार पाडल्या जात आहेत. त्यानुसार, दरवर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर पहाटेच्या सुमारास हजारो महिलांच्या उपस्थितीत होणारं सामूहिक अथर्वशीर्ष पठण यंदा केवळ पाच महिलांच्या उपस्थितीत ‘बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात पार पडलं. इथल्या या उपक्रमाला ३४ वर्षांची परंपरा आहे. ती खंडीत झाली नसली तरी मर्यादित स्वरुपात पार पडली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने ट्रस्टच्यावतीने रविवारी पहाटे १२८ व्या वर्षी ऋषिपंचमीनिमित्त अथर्वशीर्ष पठणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शितल तानवडे, सीमा लिमये, विद्या अंबर्डेकर, हेमलता डाबी, सुप्रिया सराफ या पाच महिलांनी प्रातिनिधीक स्वरुपात सहभाग नोंदवला. या महिला गेल्या १० वर्षांपासून या उपक्रमात सहभाग होत आहेत. यंदा या उपक्रमाचे ३४ वे वर्ष आहे.

अथर्वशीर्ष पठणाची सुरुवात सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शंख वादनाने झाली. ओमकार, गीत, गजर यांसह मंदिरात उपस्थित महिलांनी श्री गणराया चरणी अथर्वशीर्ष सादर केले. तसेच यावेळी गणरायाची आरती देखील करण्यात आली. गणपतीच्या आगमनाच्या दुसर्‍या दिवशी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती उत्सव मंडपासमोर होणाऱ्या अथर्वशीर्ष पठणाच्या कार्यक्रमाची शहरातील महिला वर्ग वाट पाहत असतात. मात्र, यंदा करोनामुळे हा उत्सव नेहमीप्रमाणे भव्यदिव्य स्वरूपात करता न आल्याने सर्वांची निराशा झाली. मात्र, तरी देखील अनेक महिलांनी मंदिराच्या बाहेरून ऑनलाइन स्वरुपात दर्शनाचा लाभ घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 23, 2020 8:47 am

Web Title: this year atharvashirsha recitation with presence of only five women in front of dagdusheth halwai ganpati aau 85 svk 88
टॅग : Ganesh Festival
Next Stories
1 VIDEO: जगभरातील भाविकांचं श्रद्धास्थान पुण्यातील दगडूशेठ गणपती
2 झेंडूला उच्चांकी भाव ; एक किलो झेंडू २०० ते ३०० रुपये
3 जिल्ह्य़ातील १३० ग्रामपंचायतींवर प्रशासक
Just Now!
X