करोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढू लागल्याने लागू केलेल्या निर्बंधांचा परिणाम विज्ञान दिनाच्या ((२८ फेब्रुवारी) कार्यक्रमांवर झाला आहे. करोनाच्या छायेतच विज्ञान-संशोधन संस्थांना विज्ञान दिन साजरा करावा लागणार असून, ऑनलाइन पद्धतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

खगोलशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, पेशीविज्ञान अशा विज्ञानाच्या विविध शाखांतील संस्था पुण्यात असल्याने दरवर्षी विज्ञान दिन साजरा केला जातो. गेल्यावर्षी मार्चमध्ये करोनाचा प्रादुर्भाव सुरू होऊन टाळेबंदी लागू झाल्याने विज्ञान दिन कोणत्याही अडथळ्याविना उत्साहात विविध उपक्रमांनी साजरा झाला. मात्र, गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधितांचे आकडे वाढू लागल्याने राज्य शासनाने पुन्हा काही निर्बंध लागू केले आहेत. परिणामी, विज्ञान संस्थांना ऑनलाइन कार्यक्रमांवर भर द्यावा लागत आहे. या वर्षीच्या विज्ञान दिनासाठी ‘फ्युचर ऑफ सायन्स, टेक्नॉलॉजी, इनोव्हेशन : इम्पॅक्ट्स ऑन एज्युकेशन, स्कील अँड वर्क’ ही संकल्पना आहे.

भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने (आयसर) दिवसभराचे उपक्रम यूटय़ूब वाहिनीवर आयोजित केले आहेत. ‘इंडिया सेट टू लिसन टू स्पेस टाइम मरमर्स : ग्रेडेशनल व्हेव अँड लायगो इंडिया प्रोजेक्ट’, ‘अवर युनिव्हर्स इन द ग्रेन ऑफ सँड, द हाऊज अँड व्हायज ऑफ थिअरॉटिक रीसर्च’, ‘अमेझिन प्राइम्स इन मॅथॅमॅटिक्स’ अशा विषयांवर व्याख्याने, करोना विषाणू संदर्भातील माहितीपूर्ण व्याख्यान, व्हर्च्युअल खेळणीजत्रा, विज्ञान चित्रपटांचे प्रदर्शन, टाकावूतून टिकावू वस्तू निर्मितीचे सादरीकरण, वैज्ञानिकांशी संवाद अशा उपक्रमांचा त्यात समावेश आहे.

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मेटिरिऑलॉजीने (आयआयटीएम) शुक्रवारी (२६ फेब्रुवारी) ‘अवर अ‍ॅटमोस्फिअर, एअर पॉल्युशन अँड ओझोन होल’ या विषयावर शास्त्रज्ञ रवी यादव यांचे ऑनलाइन व्याख्यान,  ‘सायन्स ऑफ वेदर अँड क्लायमेट’ या विषयावरील चर्चासत्रही होणार आहे. त्याशिवाय विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषाही होणार आहे. राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्रातर्फे (टीआयएफआर—एनसीआरए) विद्यार्थ्यांसाठी चित्रफीत तयार करण्याची स्पर्धा घेतली जाणार आहे. त्यासाठी ‘जीएमआरटी सायन्स डे’ नावाचे अ‍ॅप्लिकेशन तयार करण्यात आले. खोडद येथील जीएमआरटीच्या कार्यप्रणालीची माहिती देणारी व्याख्यानेही होतील. तसेच आंतरविद्यापीठीय खगोल आणि खगोलभौतिकी के ंद्रातर्फे  (आयुका) होणाऱ्या कार्यक्रमात ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, संचालक डॉ. सोमक रायचौधुरी सहभागी होणार आहेत. तसेच फ्युचर ऑफ सायन्स : टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन इन इंडिया या विषयावरील कविता, चित्रे पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.