करोना व्हायरसची संसर्ग झालेल्या रुग्णावर किंवा त्यांच्या कुटुंबीयांवर कोणी बहिष्कार टाकल्यास त्या व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल, पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी स्पष्ट केले. काही दिवसांपूर्वी पुण्यात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाच्या कुटुंबावर गावकऱ्यांनी बहिष्कार घातल्याचे प्रकरण पुढे आले होते. त्यानंतर आता खबरदारी घेतली जात आहे.

डॉ. दीपक म्हैसकर यांनी रविवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन सध्याच्या परिस्थितीची सविस्तर माहिती दिली. त्यावेळी ते म्हणाले की, पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या करोनाग्रस्त १६ रुग्ण बरे झाले असून, त्यांना सुटी देण्यात आली आहे. मात्र, शनिवारी रात्री पाच जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं आहे. या पाचपैकी एक जण हा ९३ जणांच्या ग्रुपसोबत थायलंडला फिरायला गेला होता. त्यांचा शोध घेण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे.

डॉ. म्हैसकर म्हणाले, “सध्या जिल्ह्यात १५ करोनाबाधित रुग्ण आहेत. त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे १६ जणांची प्रकृती बरी झाल्यानं त्यांना सुटी देण्यात आली आहे. काल काहीजण परदेशातून आले होते. त्यातील तीन जणांना करोनासदृश्य लक्षणं दिसली आहेत. त्यामुळे त्यांच्या चाचण्या केल्या जात आहेत.”

ज्या १६ जणांना सोडण्यात आलं त्यांच्यावर कोणीही बहिष्कार घालू नये, यासाठी डॉ. म्हैसकर यांनी वरील आदेश दिले आहेत.

पुणे : प्रशासनासमोर नवं आव्हान; ९३ जणांच्या ग्रुपमधील एक जण करोनाबाधित