निवडणुकीचे वर्ष असल्यामुळे ‘दिखावू’ स्वरूपाची कामे करण्यासाठी नगरसेवकांना हजार कोटी रुपयांचा निधी महापालिके च्या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आला आहे. आपापल्या प्रभागातील विविध विकासकामे करण्यासाठी नगरसेवकांना थेट एक हजार कोटी रुपये मिळणार असल्यामुळे नागरिकांच्या करातून जमा झालेल्या निधीचा निवडणूक वर्षांमुळे अपव्यय होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या अंदाजपत्रकात नगरसेवकांना देण्यात येणारा निधी आणि वॉर्ड स्तरीय कामांसाठी देण्यात आलेला निधी पाहता ही रक्कम नगरसेवकांनी सुचविलेली कामे करण्यासाठी त्यांना थेट उपलब्ध  होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रभागांमधील गल्लीबोळातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण, ज्यूट बॅग वितरण, ओला-सुका कचरा वर्गीकरणासाठी प्लास्टिक डब्यांचे वितरण, बाक बसविणे, दिशादर्शक पाटय़ा लावणे, बसथांब्यांना नावे देणे, समाजमंदिरे आणि विरंगुळा केंद्रांची उभारणी अशा कामांसाठी प्रामुख्याने खर्च करण्यास नगरसेवकांचे प्राधान्य असते. यंदाचे वर्ष निवडणुकीचे असल्यामुळे नगरसेवकांकडून सर्रास या प्रकारची कामे होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नगरसेवकांना अंदाजपत्रकात देण्यात येणाऱ्या सभासद यादी ( स यादी) मध्येच एक हजार कोटी मिळणार आहेत.

नगरसेवकांना उपलब्ध झालेल्या या निधीतून नागरी हिताची कामे होणे अपेक्षित असते. मात्र त्याच-त्याच कामांवर पुन्हा पुन्हा खर्च करून निधीची उधळपट्टी होत असल्याचे प्रकार यापूर्वी सातत्याने पुढे आले आहेत. एकच रस्ता सातत्याने खोदणे, तो सिमेंटचा करणे, रस्ता केल्यानंतर विविध प्रकारच्या सेवा वाहिन्या टाकण्यासाठी  रस्ता खोदणे, पुन्हा त्याची दुरुस्ती करणे असे प्रकार सर्वच प्रभागांमध्ये सर्रास दिसून येणार आहेत.  निधी अखर्चित राहू नये, यासाठी अनावश्यक कामांवर उधळपट्टी केली जाते. याशिवाय प्रभागात बाके बसविण्याचे प्रकारही सातत्याने होत आहेत. नागरिकांची मागणी नसतानाही लाखो रुपये बाके बसविण्यासाठी खर्च केले जात आहेत.

वॉर्डस्तरीय निधी २० लाखांचा

अंदाजपत्रकात नगरसेवकांना वॉर्डस्तरीय निधीतूनही काही निश्चित रक्कम उपलब्ध होते. प्रत्येक नगरसेवकाला वार्षिक २० लाख रुपयांचा निधी मिळतो. सभासद यादीप्रमाणेच हा निधीही नगरसेवकांच्या हक्काचा असतो. शहरात ४१ प्रभाग आहेत. यातील दोन प्रभाग त्रिसदस्यीय (प्रत्येकी तीन नगरसेवक) तर उर्वरित ३९ प्रभाग हे चार सदस्यीय आहेत. चार सदस्यांच्या ३९ प्रभागातील १५६ नगरसेवकांना ३१ कोटी रुपयांचा निधी वॉर्डस्तरीय निधीतून प्राप्त होणार आहे. तर तीन सदस्यीय नगरसेवकांच्या दोन प्रभागातील सहा नगरसेवकांना एक कोटी रुपये कामांसाठी मिळणार आहेत.