पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून तब्बल ४० लाख रुपयांचा १५० किलो गांजा अमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केला आहे. याप्रकरणी गांजा विक्रीसाठी आलेल्या बाप लेकासह मित्राला अटक केलेली आहे. सदरची कारवाई आज दुपारी बाराच्या सुमारास आळंदी-डूडूळ गाव रोड वर करण्यात आली आहे.

संजय मोहन गरड, अमोल रामभाऊ आगळे आणि रामभाऊ घनश्याम आगळे अस अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करत होते. तेव्हा, पोलीस हवालदार प्रदीप शेलार यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, आळंदी डूडुळगाव रोडवर संशयित रित्या उभा असलेल्या चारचाकी मोटारीत गांजा विक्रीसाठी आलेला आहे. त्यानुसार, अमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रमुख श्रीराम पौळ यांच्यासह पथकाने कारवाई करत मोटारीतून बाप लेकासह त्यांच्या मित्राला अटक केली. मोटारीत तब्बल ४० लाख रुपये किंमतीचा १५० किलो गांजा मिळाला असून तो जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई पथकाचे प्रमुख श्रीराम पौळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वसंत मुळे, महाले, प्रदीप शेलार यांनी केली आहे.