पुणे शहरात दोन दिवसांत एकही करोनाबाधित रुग्ण सापडला नव्हता. त्यामुळे पुणेकरांसाठी ही दिलासादायक बाब ठरली असतानाच आज (शनिवारी) पुन्हा तीन करोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे पुण्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या आता २४वर पोहोचली आहे. नव्यानं सापडलेले हे रुग्ण करोनाबाधितांच्या संपर्कात आलेले आहेत. पुणे महापालिका आरोग्य अधिकारी संजीव वावरे यांनी याची माहिती दिली.

दरम्यान, पुण्यात नव्याने तीन रुग्ण सापडल्यानतंर आता राज्यातील आकडा १८४ वर पोहोचला आहे. तर आजवर राज्यात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्यांपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. त्याचबरोबर राज्यातील २६ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परत गेले आहेत. तर बाधित आढळलेल्या १०४ रुग्णांमध्ये कोणतेही लक्षण आढळून आलेले नाही. दरम्यान, आज राज्यात नव्याने ३१ रुग्णांची नोंद झाली आहे.