कॉम्प्युटरवर गेम खेळण्यासाठी तीन विद्यार्थ्यांनी शाळेतील कॉम्प्युटर चोरल्याची घटना पिंपरी- चिंचवडमध्ये घडली आहे. बुधवारी दिघी टोल नाका येथून पोलिसांनी या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले असून त्यांनी शाळेतून दोन कॉम्प्युटर चोरले होते.
पिंपरी-चिंचवडच्या यशवंत चव्हाण विद्यालयात तीन आठवड्यांपूर्वी कॉम्प्युटर चोरीची घटना घडली होती. शाळेतील दोन माजी विद्यार्थी आणि सध्या इयत्ता ९ वी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने लॅब मधून दोन कॉम्प्युटर चोरले. या प्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असता शाळेतील विद्यार्थ्याने कॉम्प्युटर चोरल्याचे उघड झाले. पोलिसांनी दिघी टोल नाका परिसरातून या मुलांना ताब्यात घेतले आहे. या तिघांना कॉम्प्युटर गेमचे वेड होते आणि यातूनच ही चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली. रात्री उशिरा कुलुप तोडून या तिघांनी शाळेच्या लॅबमध्ये प्रवेश केला होता.
चोरी केल्यानंतर यातील एक कॉम्प्युटर शाळेतील माजी विद्यार्थ्याच्या घरी होता. तर दुसरा कॉम्प्युटर नववीत शिकणाऱ्या मुलाच्या घरात होता. दोन हजारात कॉम्प्युटर खरेदी केल्याचे त्यांनी कुटुंबीयांना सांगितले होते. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक लावंड, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवाजी भुजबळ यांच्या टीमने केली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 15, 2018 2:07 pm