रेल्वेच्या पुणे विभागाला सध्या एका मोठय़ा प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे. मागील काही दिवसांमध्ये रेल्वेतील फुकटय़ा प्रवाशांमध्ये वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. या फुकटय़ा प्रवाशांविरुद्ध कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असून, प्रत्येक महिन्याला वीस हजारांहून अधिक प्रवाशांवर कारवाई केली जात आहे. पकडलेल्यांबरोबरच आणखी मोठय़ा प्रमाणावर फुकटय़ा प्रवाशांची संख्या असण्याची शक्यता आहे. रेल्वेत तिकीट तपासणिसांची संख्या कमी असल्यानेही विनातिकीट प्रवास करणाऱ्यांमध्ये वाढ झाली असल्याचे बोलले जाते.
अनधिकृतपणे लोहमार्ग ओलांडणाऱ्या प्रवाशांविरुद्ध कारवाई करण्यासाठी रेल्वेकडून सध्या जोरदार मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या बरोबरीने विनातिकीट प्रवास करणारे त्याचप्रमाणे योग्य तिकीट नसताना प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या विरोधातही कारवाई करण्यात येत आहे. मागील वर्षांच्या तुलनेमध्ये यंदा फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येमध्ये वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक महिन्याला वीस हजारांहून अधिक फुकटे प्रवासी कारवाईमध्ये सापडत आहेत. कारवाईत पकडल्यानंतर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येते. दंड न भरणाऱ्यांना कारागृहात पाठविण्यात येते.
मध्य रेल्वेने दिलेल्या आकडेवारीनुसार पुणे विभागात एप्रिल महिन्यामध्ये २१ हजार ८८४ फुकटय़ा प्रवाशांना पकडण्यात आले होते. त्यांच्याकडून एक कोटी २४ लाख रुपयांच्या दंडाची वसुली करण्यात आली. मागील वर्षी याच महिन्यामध्ये १८ हजार ६०० लोकांना पकडण्यात आले होते. त्यामुळे मागील वर्षांच्या तुलनेत यंदा फुकटय़ा प्रवाशांमध्ये वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. फुकटय़ा प्रवाशांच्या विरोधात राबविण्यात येत असलेल्या मोहिमेमुळे रेल्वेचे होणारे नुकसान टळत असले, तरी पकडल्या गेलेल्या व्यक्तींखेरीज आणखी बरेच फुकटे प्रवासी रेल्वेत असण्याची शक्यता आहे.
तिकीट तपासणिसांची संख्या कमी
पुणे- लोणावळा लोकलमध्ये प्रामुख्याने फुकटे प्रवासी आढळून येतात. रेल्वेच्या वाढलेल्या गाडय़ा व त्यानुसार वाढलेले प्रवासी लक्षात घेता त्या प्रमाणात रेल्वेमध्ये तिकीट तपासणिसांची संख्या वाढलेली नाही. त्यामुळे बहुतांश तिकीट तपासणीस लांब पल्ल्याच्या व महत्त्वाच्या गाडय़ांमध्ये वापरले जातात. पूर्वी पुणे- लोणावळा दरम्यान धावणाऱ्या लोकलमध्ये दररोज प्रवाशांच्या तिकिटांची तपासणी केली जात होती. मात्र, मागील काही दिवसांमध्ये ही तपासणी होत नाही. केवळ एखाद्या दिवशी अचानक तपासणी मोहीम राबविली जाते. सातत्याने तपासणी होत नसल्यानेही फुकटय़ा प्रवाशांमध्ये वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. मोहिमांच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणावर फुकटे प्रवासी सापडत असले, तरी विनातिकीट प्रवास करण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी तिकीट तपासणिसांची संख्या वाढविणे आवश्यक आहे.