पुणे विद्यापीठाच्या निकालाचे वेळापत्रक यावर्षीही सपशेल कोलमडल्याचे दिसत आहे. अभियांत्रिकी शाखेचे निकाल रखडले आहेतच, मात्र जाहीर झालेले निकालही विद्यापीठानेच ठरवलेल्या वेळापत्रकापेक्षा एक महिना उशिरा जाहीर झाले आहेत.
सत्र परीक्षा सुरू होण्यापूर्वीच अर्ज भरण्यापासून ते निकालाच्या अपेक्षित तारखेपर्यंतचे वेळापत्रक जाहीर करून पुणे विद्यापीठाने विद्यार्थ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. मात्र, ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या सत्र परीक्षेचे लागलेले निकाल आणि वेळापत्रकाचा काहीही संबंध राहिलेला नसल्याचेच समोर येत आहे.
विद्यापीठाच्या अभियांत्रिकी शाखेचे निकाल अद्याप रखडलेलेच आहेत. त्याबाबत,‘अभियांत्रिकीसाठी विद्यार्थी संख्या जास्त आहे, शाखा अनेक आहेत, त्यामुळे निकाल वेळेत लागत नाहीत,’ अशी भूमिका विद्यापीठ प्रशासनाने घेतली आहे. मात्र, एम.ए, एम.कॉम या परीक्षांचे निकालही अजून रखडलेलेच आहेत. प्रत्यक्षात अभियांत्रिकी शाखेचेच नाहीत, तर विद्यापीठाच्या सर्वच शाखांचे निकाल नियोजित वेळापत्रकाप्रमाणे लागलेले नाहीत. विधी शाखेच्या विविध परीक्षांचे निकाल हे नियोजित वेळापत्रकापेक्षा पंधरा दिवस उशिरा जाहीर झाले आहेत, तर विज्ञान, वाणिज्य, व्यवस्थापन या शाखांचे निकाल साधारणपणे  एक महिना उशिरा जाहीर झाले आहेत. एमबीए परीक्षेचा निकाल १७ जानेवारीला जाहीर होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात हा निकाल १७ फेब्रुवारीला जाहीर झाला आहे. एम.एस्सी. परीक्षांचे निकाल ११ जानेवारी ते २० जानेवारी दरम्यान जाहीर होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात हे निकाल १३ ते १७ फेब्रुवारी दरम्यान जाहीर झाले. एम.एस्सी. रसायन शास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतिशास्त्र या शाखांचे निकाल अजूनही जाहीर झालेले नाहीत.
या सत्र परीक्षेच्या वेळी कोणताही बहिष्कार, संप, आंदोलन असे काहीही नसतानाही उशिरा लागलेल्या निकालांचे काय स्पष्टीकरण द्यायचे असा नवा प्रश्न परीक्षा विभागाला सध्या पडला आहे. विद्यापीठ प्रशासनाने मात्र निकाल उशिरा लागण्याची विद्यार्थ्यांना आता सवय झाली आहे, हे गृहीतच धरले आहे.
 
नियम काय सांगतो?
विद्यापीठाने परीक्षा झाल्यापासून ३० दिवसांमध्ये निकाल जाहीर करणे आवश्यक आहे. त्यानंतर निकाल जाहीर करण्यासाठी अधिक १५ दिवस मिळू शकतात. मात्र, त्यासाठी कुलपतींची परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र, पंचेचाळीस दिवसांमध्ये विद्यापीठाने परीक्षांचे निकाल जाहीर न केल्यास त्याबाबतचा सविस्तर अहवाल कुलपतींना देणे बंधनकारक आहे.