‘जाऊ तिथे खाऊ’ चित्रपटातील चोरीला गेलेल्या ‘विहिरी’सारखेच एक प्रकरण िपपरीगावात उघडकीस आले आहे. भर चौकात असलेले स्वच्छतागृह अचानक ‘चोरीला’ गेले आहे. जवळपास नऊ लाख रुपये खर्च करून हे स्वच्छतागृह बांधले व ते काम पूर्ण झाल्याचे पत्र अधिकाऱ्यांनी दिले असताना प्रत्यक्षात ते जागेवर नाही. त्यामुळे या नऊ लाखाच्या खर्चाचे गौडबंगाल काय, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

भाजपचे कार्यकर्ते नेहुल कुदळे यांनी हा ‘उद्योग’ पालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या निदर्शनास आणून दिला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची व दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष डब्बू आसवानी यांच्या प्रभागातील हे प्रकरण आहे. चार वर्षांपूर्वी अशोक सिनेमासमोर महापालिकेने हे स्वच्छतागृह बांधल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला असून, त्यासाठी नऊ लाख रुपये खर्च केल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात जागेवर स्वच्छतागृह नाही. त्यामुळे सार्वजनिक स्वच्छतागृह उभारणीचा खर्च कोणाच्या घशात गेला, याच्या चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे. ठेकेदार व दोषी अधिकाऱ्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी कुदळे यांनी आयुक्तांकडे केली आहे. या स्वच्छतागृहासाठी २०११मध्ये निविदा काढण्यात आली. संबंधित ठेकेदाराला नऊ लाख १४ हजार रुपयांना काम देण्यात आले. फेब्रुवारी २०१२ मध्ये काम पूर्ण करणे आवश्यक होते, मात्र ठेकेदाराला मुदतीत काम पूर्ण करणे जमले नाही. त्यामुळे ठेकेदाराला एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे दाखवण्यात आले. पुढे पुरेशी तरतूद नसल्याने काम मंदावले व नंतरच्या वर्षांत तरतूद मिळाल्यानंतर हे काम पूर्ण करण्यात आल्याचे सांगून तसे पत्र २७ एप्रिल २०१२ला देण्यात आले होते. प्रत्यक्षात जागेवर स्वच्छतागृह नसल्याचे कुदळे यांनी आयुक्तांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. यासंदर्भात कोणीही अधिकारी बोलण्याच्या मन:स्थितीत नाहीत.