एकमेकांच्या मागे पळणारी, धडपडणारी आणि तुम्हाला आपल्या भन्नाट करामतींनी पोटभर हसवणारी ‘टॉम’ नावाच्या राखाडी मांजर आणि ‘जेरी’ नावाच्या चॉकलेटी उंदराची जोडी आठवतेय? ही जोडी तब्बल ४० वर्षांनतर तुम्हाला पुन्हा आपल्या नवीन करामतींनी हसवण्यासाठी कार्टुन नेटवर्कवर परत आली आहे. त्यांचा कधीही न संपणारा पाठलाग २१ एप्रिलपासून सुरू झाला आहे..
सतत एकाच उंदरामागे पळणारा, त्या उंदराला पकडण्यासाठी नाना क्लृप्त्या शोधणारा, ‘स्पाइक’ कुत्र्यापासून स्वत:चा बचाव करणारा, धडपडणारा, मालकाचा ओरडा खाणारा ‘टॉम’ आणि त्याच टॉमपासून स्वत:चा बचाव करणारा, काही वेळा त्याला उगाचच त्रास देणारा छोटासा हुशार उंदीर ‘जेरी’ यांनी कित्येक दशके आबालवृद्धांचे चांगले मनोरंजन केले. लहान मुलांपासून आजोबांपर्यंत सर्वानाच या मांजर आणि उंदाराने चांगलेच वेड लावले. जोसेफ बार्बरा आणि विल्यम हॅना यांनी १९४० मध्ये मूळ ‘टॉम अॅण्ड जेरी शो’ या कार्टुनची निर्मिती केली होती.
याच ‘टॉम कॅट’ आणि ‘जेरी माउस’ यांची जोडगोळी २१ एप्रिलपासून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. याची निर्मिती वॉनर ब्रदर्सतर्फे करण्यात आली आहे. हे कार्टुन ‘कार्टुन नेटवर्क’ या वाहिनीवर सोमवार ते गुरुवार रोज दुपारी २ वाजता दाखविले जाणार आहे, अशी माहिती टर्नर इंटरनॅशनल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या दक्षिण आशिया विभागाचे कार्यकारी संचालक आणि नेटवर्क प्रमुख कृष्णा देसाई यांनी दिली.
नवीन काय?
नवीन सुरू झालेल्या ‘टॉम अॅण्ड जेरी शो’च्या सर्व मालिका नवीन आहेत. या मालिकांच्या कथा, प्रसंग आणि परिसरही नवीन आहे. नवीन मालिकांमध्ये टॉम आणि जेरी नवीन प्रसंगांमध्ये नवीन ठिकाणी एकमेकांचा पाठलाग करतील. ते कधी चेटकिणीच्या गुहेत जातील किंवा कधी एखाद्या शास्त्रज्ञाच्या प्रयोगशाळेमध्येही पोचतील आणि आपल्याला हसवतील.
नवीन मालिका, पात्रे जुनीच
नवीन मालिकांमध्ये केवळ टॉम आणि जेरी नसून त्यांना मदत करण्यासाठी इतरही पात्रे आहेत. जुन्या मालिकांमधील सर्व पात्रे टॉम आणि जेरी यांच्याबरोबर तशीच ठेवण्यात आली आहेत. पण कोणत्याही नवीन पात्राचा समावेश करण्यात आलेला नाही. स्पाइक कुत्रा, जेरीचा भाचा टफी उंदीर, टॉमचा मित्र बुच, बदक लिटील क्व्ॉकर आणि टॉमची मैत्रीण टुडल्स गॅलोर ही जुनी पात्रे तशीच ठेवण्यात आली आहेत.