आगामी नाटय़संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी तीन नावांची चर्चा होत असली तरी त्याविषयी कोणताच निर्णय न झाल्यामुळे पुण्यातील रंगकर्मीची संधी हुकणार का, अशी चर्चा नाटय़वर्तुळामध्ये रंगली. पुण्यातून एक नाव सुचविण्याबाबत शनिवारी (२८ सप्टेंबर) अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष सुरेश देशमुख यांनी सांगितले.
नाटय़संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी नावे सुचविण्यासंदर्भात पुणे शाखेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक गुरुवारी झाली. ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर, संगीत रंगभूमीवरील प्रसिद्ध गायिका-अभिनेत्री कीर्ती शिलेदार आणि लोकरंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी या तीन नावांची बैठकीमध्ये चर्चा झाली. आळेकर यांचे नाव शुभांगी दामले यांनी, शिलेदार यांचे नाव सुरेश देसमुख यांनी आणि गांधी यांचे नाव प्रदीपकुमार कांबळे यांनी सुचविले. मात्र, ही तीनही नावे पाठवायची की यापैकी एक नाव नाटय़ परिषदेकडे कळवायचे यावर एकमत झाले नाही. त्यामुळे नाटय़संमेलनाचे स्थळ निश्चित झाल्यानंतरच अध्यक्षपदासंदर्भातील नावाचा निर्णय घ्यावा, अशी भूमिका घेत कोणत्याही निर्णयाविना ही बैठक पार पडली.
नाटय़ परिषदेचे प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर यांनी राज्यातील सर्व शाखांना अध्यक्षपदासाठी नावे सुचविण्यासंदर्भात पत्र पाठविले आहे. या पत्रानुसार अध्यक्षपदासाठी नाव सुचविण्याची ३० सप्टेंबर ही अंतिम मुदत असून, त्यानंतर सुचविलेल्या कोणत्याही नावाचा विचार करता येणार नाही, असे नमूद करण्यात आले आहे. यासंदर्भात विचारले असता सुरेश देशमुख म्हणाले, हे पत्र आम्हाला मिळाले आहे. त्यानुसार आता शनिवारी रात्री आम्ही पदाधिकारी पुन्हा एकत्र येणार आहोत. ज्या तीनजणांची नावे सुचविण्यात आली आहेत त्यांचीही संमती घेऊनच त्यापैकी एक नाव निश्चित करून ते नाटय़ परिषदेकडे कळविण्यात येणार आहे.
संमेलनाचे स्थळ आणि अध्यक्ष
होणार ६ ऑक्टोबरला निश्चित
आगामी नाटय़संमेलनासाठी नागपूर, सातारा आणि पंढरपूर अशा तीन ठिकाणची निमंत्रणे आली आहेत. त्यानुसार नाटय़ परिषदेच्या स्थळ निवड समितीने दोन ठिकाणांना भेटी दिल्या आहेत. आता नाटय़ परिषदेच्या नियामक मंडळाची बैठक ६ ऑक्टोबर रोजी होत आहे. या बैठकीमध्येच संमेलनाचे स्थळ आणि आगामी नाटय़संमेलनाध्यक्ष निश्चित केले जाणार आहेत.