पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी गेले कित्येक वर्षे अनेक उपाय सुचविण्यात आले, मात्र त्यावर हवी तशी कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे हा मार्ग तयार झाल्यानंतर आता १२ वर्षांनंतरही समस्या कायम आहेत. अपघात होत आहेत आणि वाहतूक कोंडीमुळे प्रवासाला जास्त वेळ लागत आहे. यातील काही जबाबदारी या रस्त्याची व्यवस्था पाहणाऱ्या आयआरबी कंपनीवर, तर काही जबाबदारी सरकारवर येते.
द्रुतगती महामार्गाच्या निर्मितीपासूनच खंडाळा घाटातील अमृतांजन पुलाच्या परिसरात अपघात व वाहतूक कोंडी होत आली आहे. काही तज्ज्ञांच्या मते तर ही निर्मितीच्या वेळची चूक आहे. कारण इतका तीव्र उतार आणि त्यातच वळण असे असेल तर ते अपघातांना आमंत्रणच ठरते. या स्थितीत दोन वर्षांपूर्वी एक उपाय करण्यात आला. पण तो अर्धवटच आहे. हा उपाय म्हणजे- घाट परिसरात बंद पडणारी किंवा अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यासाठी एक पूलर मशिन, हायड्रा क्रेन व लहान अग्निशमन बंब ठेवण्याचा. या गोष्टी खरेदी करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ नाही. आठवडय़ापूर्वी याच कारणामुळे वाहतुकीची कोंडी झाली. एका टँकरचा अपघात झाल्यानंतर तो दूर करण्यासाठी तेथे पूलर मशीन व हायड्रा पाठवण्यात आले. तो टँकर ओढून नेताना त्याला विशिष्ट दोर न लावता बेल्ट लावण्यात आले. टँकरच्या वजनामुळे तो बेल्ट तुटला. त्यामुळे टँकर खाली घसरला आणि हायड्रासुद्धा उलटला. त्यामुळे तब्बल सात तास वाहतूक खोळंबली होती.
दुसरी बाब म्हणजे- वेगावर मर्यादा ठेवण्यासाठी पोलिसांकडे पुरेशी सामग्री नाही. स्पीड गन आहेत, त्या दोन-चारच. त्यामुळे वेगात वाहन चालविणाऱ्यांवर किंवा लेनची शिस्त तोडणाऱ्यांवर योग्य त्या प्रमाणात कारवाई करणे शक्य होत नाही.
द्रुतगती मार्ग आणि जुना पुणे-मुंबई महामार्ग हे घाटात एकत्रत येतात. ते वेगवेगळे करण्याचे रस्ता विकास महामंडळाचे काही प्रस्ताव आहेत. दोन्ही मार्गाच्या दुतर्फा एक-एक लेन वाढवावी किंवा खोपोली ते लोणावळा दरम्यान बोगदा बनविण्याचा मार्ग आहे. मात्र, त्यासाठी येणाऱ्या खर्चाचा विचार करून तो सध्या तरी पडून आहे.
याचबरोबर अमृतांजन पुलाजवळ ‘तीव्र उतार व वळणाचा रस्ता’ असे ठसठशीत फलक लावायला हवेत. आवश्यक तेथे ब्लिंकर्स लावायला हवेत. तेथे रात्रीच्या वेळी काळोखामुळे काहीच अंदाज येत नाही. समोरासमोर येणाऱ्या वाहनांच्या डोळ्यांवर प्रखर प्रकाश पडतो. या लहान-मोठय़ा गोष्टींची पुरेशी काळजी घेण्यात आलेली नाही, अशी प्रवशांची तक्रार आहे.

‘‘घाटात नेहमीच अडचणी येतात. वळणावर मार्कर नाहीत, बोर्ड नाहीत. अमृतांजन अरुंद पॉईंट आहे. देखभाल दुरुस्ती केली जात नाही. वेग किती हवा, हे फलक लावायला हवेत.’’
– प्रमोद गायकवाड, लोणावळा