प्रवासी वाहतुकीतील कंपन्यांचे वाढते प्रस्थ; रिक्षा संघटना- प्रवासी कंपन्यांमध्ये वादाची ठिणगी

शहरांतर्गत वाहतुकीमध्ये प्रवासी वाहतुकीतील कंपन्यांचे वाढते प्रस्थ लक्षात घेता शहरात टुरिस्ट टॅक्सींची संख्या वाढत आहे. दसऱ्याच्या निमित्ताने मागील अनेक वर्षांच्या तुलनेत यंदा टुरिस्ट टॅक्सींची खरेदी वाढल्याने ही बाब स्पष्ट होत आहे. यापुढेही या गाडय़ांची संख्या शहरातील रस्त्यांवर वाढत जाणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, पर्यटनाचा परवाना असलेल्या या गाडय़ा शहरांतर्गत व्यवसाय करीत असल्याने रिक्षा संघटना व प्रवासी कंपन्यांबाबत मागील काही दिवसांपासून वाद सुरू आहे.

शहरात प्रामुख्याने माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांसह इतर काही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना वाहतूक सेवा देण्यासाठी टुरिस्ट टॅक्सीचा वापर करण्यात येत होता. कंपनीकडून वाहतूक ठेकेदाराची नेमणूक केली जाते. संबंधित ठेकेदार इतर अनेकांची वाहने घेऊन कंपनीला सेवा देतो. या व्यवसायात चांगली कमाई असल्याने अनेक टॅक्सी माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत होत्या. मागील काही वर्षांमध्ये खासगी वाहतूक कंपन्यांनी शहरांतर्गत भागात टॅक्सीची सेवा सुरू केली. दूरध्वनी करून हव्या त्या ठिकाणी हव्या त्या वेळेला टॅक्सी उपलब्ध होत असल्याने नागरिकांनीही त्याचा चांगला प्रतिसाद दिला. ही सेवा विस्तारत असताना ठेकेदाराप्रमाणेच प्रवासी वाहतुकीतील कंपन्यांनीही इतरांच्या टॅक्सी कंपनीत समाविष्ट करून घेतल्या. त्यामुळे या व्यवसायासाठी टॅक्सीची खरेदी पुन्हा वाढली.

दसऱ्याच्या मुहूर्तावर झालेल्या टुरिस्ट टॅक्सी खरेदीतून या क्षेत्रातील वाढती मागणी लक्षात येत आहे. मागील वर्षी दसऱ्याला ५४ टुरिस्ट टॅक्सींची खरेदी झाली होती. त्यापूर्वीही याच प्रमाणात ही खरेदी होत होती. मात्र, यंदा ही संख्या थेट २४५ टुरिस्ट टॅक्सींवर गेली. दिवाळीतही ही खरेदी सुरू राहणार असल्याची शक्यता वाहन बाजारातून व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, प्रवासी क्षेत्रातील कंपन्यांना केवळ पर्यटनाचा परवाना मिळतो. टुरिस्ट टॅक्सी घेताना टप्पा वाहतूक होणार नसल्याचे प्रमाणपत्रही लिहून घेतले जाते. मात्र, पर्यटनाच्या नावावर टुरिस्ट टॅक्सीकडून शहरांतर्गत व टप्पा वाहतूक दिली जात आहे. ही सेवा नियमबाह्य़ असल्याचा सांगत रिक्षा संघटनांकडून या सेवेला तीव्र आक्षेप घेण्यात येत आहे.