फिक्कीचे अध्यक्ष रशेश शहा यांची अपेक्षा 

उद्योजकांनी नवी मूल्ये आत्मसात करण्याबरोबरच व्यवसायात पारदर्शकता ठेवणे ही काळाची गरज आहे. उद्योजकांनी बिनपावत्यांचे व्यवहार टाळावेत, अशी अपेक्षा फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे (फिक्की) अध्यक्ष रशेश शहा यांनी व्यक्त केली. या सभेत मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रिकल्चरच्या (एमसीसीआयए) अध्यक्षपदाची सूत्रे  एमसीसीआयएचे मावळते अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांच्याकडून प्रदीप भार्गव यांनी स्वीकारली. चेंबरचे महासंचालक डॉ.अनंत सरदेशमुख या वेळी उपस्थित होते.

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रिकल्चरच्या (एमसीसीआयए) ८४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ‘टूवर्डस न्यू इंडिया’ या विषयावर शहा यांचे व्याख्यान झाले. शहा म्हणाले,की जागतिक पातळीवर अस्थिरता कायम राहणार असली तरी त्या तुलनेत भारतीय कंपन्या सामथ्र्यशाली आहेत. विशेषत: भारतातील लघू व मध्यम उद्योग सध्या अतिशय उत्तम काम करत आहेत.

अध्यक्षपदाच्या काळातील कामांचा आढावा घेताना प्रमोद चौधरी म्हणाले, ऑटो क्लस्टरचे पुनरूज्जीवन केल्याने चेंबरच्या अधिकाधिक सभासदांना त्याचा लाभ झाला. जीएसटी या महत्त्वपूर्ण स्थित्यंतरातून जाताना उद्योजकांसाठी सुरू केलेली जीएसटी वॉर रूम फायद्याची ठरली.

सर्व उद्योगांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत सरकारकडे पाठपुरावा करून त्या सोडविण्याची ग्वाही प्रदीप भार्गव यांनी दिली. ते म्हणाले,की केवळ नफा कमावण्यावर भर न देता उद्योगांनी सामाजिक विकासामध्ये योगदान दिले पाहिजे. उद्योजकांसाठी पर्यावरण दृष्टिकोन विकसित करण्यावरही भर देण्यात येणार आहे.

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रिकल्चरच्या ८४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत डॉ. प्रमोद चौधरी यांच्याकडून प्रदीप भार्गव यांनी नूतन अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. रशेश शहा आणि डॉ.अनंत सरदेशमुख या वेळी उपस्थित होते.