भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) मुंबई-दिल्ली या द्रुतगती महामार्गाला जोडून एक नवा महामार्ग बांधण्याची योजना आखली आहे. हा मार्ग उत्तरेकडून येणारी वाहतूक मुंबई-पुणे टाळून सूरत-नाशिक-नगर-सोलापूरमार्गे दक्षिणेकडे घेऊन जाईल. त्यामुळे मुंबई आणि पुण्यातील वाहतूकभार कमी होईल.

पुण्यातील राष्ट्रीय महामार्गाचा आढावा घेतल्यानंतर केंद्रीय रस्तेवाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी या प्रस्तावित महामार्गाची माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘उत्तर भारतातील पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, काश्मीर आणि राजस्थान, तर पश्चिम भारतातील गुजरात या राज्यांमधून दक्षिणेत म्हणजे बेंगळुरू, त्रिवेंद्रम, हैदराबाद आणि चेन्नई या ठिकाणी जाणारी सर्व वाहतूक सध्या मुंबई आणि पुण्यातून मार्गस्थ होते. त्यामुळे मुंबई, पुण्यातील महामार्गावर वाहनांची वर्षभर प्रचंड वर्दळ असते. यावर मार्ग काढण्यासाठी मुंबई-दिल्ली द्रुतगती महामार्गाबरोबरच नवा महामार्ग प्रस्तावित के ला आहे.’’

जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) ते दिल्ली महामार्ग प्रकल्पाची किंमत एक लाख कोटी रुपये असून मार्गासाठी १२० मीटरची रूंदी संपादित केली आहे. हा मार्ग १२ पदरी असून पहिल्या टप्प्यात आठपदरी करण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे मुंबई ते दिल्ली हे अंतर १२-१३ तासांत कापले जाणार आहे, असेही गडकरी यांनी सांगितले.

कोंडीवर उतारा..

* २५ हजार कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाचे काम चार ते पाच महिन्यांत सुरू करण्यात येईल.

* मुंबई-दिल्ली द्रुतगती महामार्गाला सूरतजवळ छेदणाऱ्या एका नव्या महामार्गासाठी भूसंपादन सुरू आहे.

* हा महामार्ग मुंबई-पुणे टाळून सूरतवरून नाशिक-नगर-सोलापूरमार्गे दक्षिणेकडे जाईल.

* मुंबई आणि पुण्यावरील वाहतूकभार कमी झाल्याने कोंडी कमी होईल, अपघात आणि प्रदूषण घटेल.