वाहतुकीचे नियम सर्वाना ठाऊक आहेत. ते आपल्या हितासाठीच आहेत हे माहीत असतानाही नियमांचे पालन करण्याच्या मनोवृत्तीचा नागरिकांमध्ये अभाव जाणवतो. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांमध्ये सुशिक्षितांचे वाढते प्रमाण ही चिंतेची बाब आहे.. गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आपल्या परीने खारीचा वाटा उचलत वाहतूक स्वयंसेवक म्हणून आपली कामगिरी चोखपणाने पार पाडणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचे हे निरीक्षण आहे. ‘हे काम आमच्यासाठी वसा आहे. त्यामुळे कितीही अपमान सहन करावा लागला तरी घेतला वसा टाकणार नाही’, अशी भावनाही या ज्येष्ठ वाहतूक स्वयंसेवकांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.

वाहतूक नियमांबाबत प्रबोधन करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे सामाजिक रक्षाबंधन उपक्रमात वाहतूक सुरक्षा अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाअंतर्गत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे आयोजित कार्यक्रमात वाहतूक नियम पालनाची शपथ घेण्यात आली, तसेच या वाहतूक स्वयंसेवकांचा सत्कार करण्यात आला.

पूलगेट आणि वानवडी परिसरात वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न करणारे ऐंशी वर्षांचे तीर्थराज भाटिया, सिम्बायोसिस प्रायमरी स्कूल आणि कोथरूडच्या परांजपे स्कूल येथे शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेस मुलांना सुरळीतपणे जाता यावे यासाठी कार्यरत असलेल्या सत्तरी पार केलेल्या प्रभा नेने ऊर्फ नेनेआजी आणि टिळक रस्त्यावर महाराष्ट्र साहित्य परिषद येथील चौकात गेल्या दशकापासून गर्दीच्या वेळी वाहतूक नियंत्रण करणारे पन्नाशी पार केलेले राम पाटील या वाहतूक स्वयंसेवकांचा त्यांच्या योगदानाबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे आणि वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल नलावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सतत वर्दळीच्या असलेल्या टिळक रस्त्यावर वाहतूक नियंत्रित करण्यासाठी सामान्य नागरिक म्हणून मी छोटासा प्रयत्न करतो. सिग्नलला दोन मिनिटे थांबण्याचाही लोकांकडे संयम नसतो. काही करून आपली गाडी पुढे कशी दामटता येईल, अशीच सर्वाची कृती असते. त्यामुळे कितीही नियम केले तरी या भागातील वाहतूक कोंडी दूर होत नाही, याकडे राम पाटील यांनी लक्ष वेधले. काही लोक समजावून सांगितले तर ऐकतात. काहीजण उलट उत्तरे देत वाद घालतात. कोणतेही अधिकार नसल्यामुळे काही बोलण्याची सोय नाही. पोलीस चौकी आणि न्यायालयात जाण्यासाठी वेळ असलेल्या लोकांचे नियमांचे पालन करण्याकडे मात्र दुर्लक्ष होत असते, अशी टिप्पणी पाटील यांनी केली.

नगर रस्त्यावरील इंटरनॅशनल कॉम्प्युटर्स येथून निवृत्त झालेल्या प्रभा नेने यांनी ‘निर्धार ट्रस्ट’च्या माध्यमातून वाहतूक या प्रश्नावर काम करण्यास सुरुवात केली. वाहतुकीचे नियम माहीत असूनही त्यांचे पालन करण्याची मनोवृत्ती दिसत नाही. नियमांचे उल्लंघन करण्यामध्ये सुशिक्षितांची संख्या वाढत असून ही चिंतेची बाब असल्याचे नेने यांनी सांगितले. वाहतुकीचे नियंत्रण करताना बरे-वाईट अनुभव येतात. पण, या कामाची आवड असल्याने नाऊमेद न होता ऊर्जा संपादन करण्यासाठी मी रस्त्यावर उभी राहते. शालेय विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेस किमान अर्धा तास तरी आम्ही ‘स्कूल गेट व्हॉलेंटियर’ उपक्रम राबवितो, असे त्यांनी सांगितले.

वयाच्या ऐंशीव्या वर्षी मी पूलगेट आणि वानवडी परिसरातील रस्त्यांवर उभा असतो, असे तीर्थराज भाटिया यांनी सांगितले. माझा जन्म सिंध प्रांतातील. फाळणी झाल्यानंतर १९४७ मध्ये मी मुंबईला आणि नंतर पुण्याला आलो. रेडिओ दुरुस्ती हा माझ्या उपजीविकेचा व्यवसाय होता. अविवाहित असल्यामुळे गरजा कमी आहेत, असे त्यांनी सांगितले. ‘िजदगीमें कुछ अच्छे लोग होते है तो कुछ बुरे लोगभी होते है, मैं लोगोंको अनुशासन बताता हूँ, लेकिन सबसे तेज चलाने की आदत से मजबूर जवान छोकरे सुनते नही’, अशा शब्दांत भाटिया यांनी वास्तवावर बोट ठेवले.