निष्क्रिय कारभार उघडकीस; उद्यान विभाग अनभिज्ञ

शहरात बेकायदा वृक्षतोडीचे प्रकार सातत्याने उघडकीस येत असताना महापालिका आणि उद्यान विभागाचा निष्क्रिय कारभार पुढे आला आहे. वाडिया महाविद्यालयाशेजारील मंगलदास रस्त्यावरील झाड दिवसाढवळ्या जमीनदोस्त करण्यात आले. पण हे झाड कोणी आणि कोणत्या कारणासाठी तोडले, याची कोणतीही माहिती महापालिका आणि उद्यान विभागाकडे नाही. अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या ढोले-पाटील क्षेत्रीय कार्यालयालाही त्याचा पत्ता नसून राजरोसपणे झालेल्या या वृक्षतोडीची चर्चा मात्र सुरु झाली आहे.

बांधकाम करणे, सार्वजनिक हिताच्या प्रकल्पांची उभारणी करणे, या आणि अशा काही कारणांसाठी वृक्षतोड करण्यात येते. मात्र त्यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाची परवानगी संबंधितांना घ्यावी लागते. वृक्षतोडीला मान्यता देताना काही झाडे लावण्याचे बंधनही घालण्यात येते. मात्र उद्यान विभागाची मान्यता न घेताच बेकायदा वृक्षतोड होत असल्याच्या तक्रारी सातत्याने होत आहेत. त्यावर कार्यवाही करणे तर दूरच, पण त्याची दखलही घेतली जात नाही. आता तर दिवसाढवळ्या मंगलदास रस्त्यावरील झाड कटरच्या साहाय्याने सोमवारी जमीनदोस्त करण्यात आले. हे झाड कोणी तोडले, कोणत्या कारणासाठी तोडले, त्यासाठी परवानगी होती का, याची कोणतीही माहिती उद्यान विभागाकडे नाही. मंगलदास रस्त्यावरून काही मिनिटांच्या अंतरावर ढोले-पाटील रस्ता क्षेत्रीय कार्यालय आहे. या कार्यालयाकडेही त्याची कोणतीही माहिती नाही. मात्र झाड तोडल्यानंतर टेम्पोद्वारे त्याची वाहतूक करण्यात आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीकडून देण्यात आली.