प्रिया भिडे (सदस्य, महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी)

फुले तिळाची गच्च दाटली शेवंती बहराला आली

पिवळी धम्मक हळदीसम ही राने झाली

सध्या शेतांमधून दिसणाऱ्या दृश्याचे असे सुंदर वर्णन एका कवयित्रीने केले आहे. पहाटेचा गारवा, थंडीची चाहूल अन् दिवाळीचे आगमन होत आहे. दिवाळीची सुरुवात सुवासिक उटणे अन् तिळाचे तेल लावून अभ्यंगस्नानाने होते. हजारो वर्षांपासून तीळ, शेंगदाणा, करडई, सूर्यफूल अन् मोहरीच्या तेलबिया आपले आरोग्यवर्धन व सौंदर्यवर्धन करत आल्या आहेत. प्रांतानुसार तेलबियांचा वापर बदलतो. परंतु भारतीय खाद्यसंस्कृतीत तीळ, शेंगदाणा, कारळे व मोहरी यांचा वापर रोजच होतो. कारण त्यातील आरोग्यवर्धक घटक व विशिष्ट स्वाद! या तेलबिया आपण आपल्या छोटय़ा बागेतही सहज लावू शकतो.

छोटय़ा वाफ्यात, पसरट ट्रेमध्ये अथवा आडव्या कुंडीत आठ आठ इंचावर तीळ लावले, की रोपे तरारतात. रोपे दीड-दोन फुटांपर्यंत वाढतात. तिळाच्या प्रकारानुसार फुलांचे रंग बदलतात. पांढऱ्या तिळास पांढऱ्या रंगाची, घंटेसारखी फुले येतात. जांभळय़ा रंगाची सुंदर फुले असलेला जटतीळ हा याचा रानातला भाऊबंद, तिळाची फुले सुकल्यावर तेथे चार कप्प्यांच्या कुप्या तयार होतात. या कुप्या थोडय़ा वाळल्या, की झाडे काढून ठेवायची आणि कुप्या पूर्ण वाळल्यावर तीळ हलक्या हाताने चोळून काढायचे.

घरात आणलेल्या शेंगदाण्यातील थोडे टपोरे शेंगदाणे सेंद्रिय मातीच्या वाफ्यात किंवा दोन-तीन आडव्या कुंडय़ांत लावले तर शेंगदाण्याची रोपे तरारून येतील. रोपांना पिवळी फुले येतात. शेंगा जमिनीत वाढतात. चार महिन्यांनी शेंगांची रोपे अलगद उपटलीत, तर पसाभर कोवळय़ा शेंगा मिळतील. रोपांच्या मुळांवरील नत्राच्या गाठी घरातील मुलांना बघता येतील. शेंगदाण्याची रोपे हवेतील नत्रवायू (नायट्रोजन) जमिनीत स्थिर करतात व जमिनीचा कस वाढवतात. याचे प्रात्यक्षिक मुलांना बघता येईल अन् कोवळय़ा शेंगांची मजा लुटता येईल.

अत्यंत महत्त्वपूर्ण व रोजच्या वापरातली तेलबी मोहरी. फोडणीसाठी, लोणच्यासाठी केशवर्धनासाठी मोहरी वापरतात. ती तिच्यातील बुरशीनाशक गुणांमुळे. या ‘राई’चे गुण पर्वताएवढे आहेत. म्हणून तीक्ष्ण, तिखट स्वादाची, मोहरी बागेत बारा महिने हवीच.

सध्या छोटय़ा मावळय़ांनी किल्ल्यावर हिरवाईसाठी मोहरी पेरली असेलच. तशीच एखाद्या वाफ्यात, जुन्या सोलरच्या ट्रेमध्ये अथवा दोन-चार कुंडय़ांत मातीवर मोहरीचे दाणे लावावेत. वरून कोकोपीथ व मातीचा पातळ थर द्यावा. महिन्याभरात पाने तरारतील. रोपे फार जवळ आली असल्यास उपटून कोवळी पाने भाजी वा सॅलडसाठी वापरता येतील. मक्याची रोटी, पराठय़ाबरोबर ‘सरसो का साग’ म्हणून खाता येतील. ही विरळणी केल्यावर रोपे दोन-अडीच फूट वाढतील. पानांच्या मधून फुलांचा दांडा वर येईल व असंख्य नाजूक पिवळी फुले येतील. ही फुले फार सुंदर दिसतात. चार-पाच कुंडय़ांत लावल्यास बागेची शोभा वाढवतात. मोहरीची जुने पाने कीड आकर्षित करतात. या पानांवर कीड आली, की पाने काढून मातीत पुरून टाकावीत किंवा कुजवून त्याचे पाणी झाडांना द्यावे. मोहरी इतर झाडांचे किडीपासून रक्षण करते. विशेष करून कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, वांगी अशा भाज्यांच्या जवळ मोहरी जरूर लावावी. मोहरीची फुले मधमाश्यांना फार आवडतात. वेगवेगळय़ा प्रकारच्या अनेक माश्या, कीटक या फुलांना भेट देतात व मोहरीच्या अनेक नाजूक हिरव्या शेंगा तयार होतात. दोन महिन्यांत शेंगा भरतात. या कोवळय़ा शेंगा चविष्ट लागतात.रोपे थोडी सुकल्यावर शेंगा पिवळय़ा पडतात. त्या वेळी रोपे अलगद उपटून उभी करून ठेवावीत व कोरडी झाल्यावर चादरीत गुंडाळून हलक्या हाताने चोळून मोहरी काढावी. अगदी आठ-दहा झाडांपासून दोन-तीन वाटय़ा मोहरी सहज येते. ही मोहक मोहरी आपल्या घरात जरूर फुलवा.