गृहपालाकडून विद्यार्थ्यांना देण्यात येणारा त्रास, विद्यार्थ्यांवर आणले जात असलेले दडपण, अपुऱ्या शैक्षणिक सुविधा, थकीत शैक्षणिक शुल्क, अभ्यासिकेची दुरवस्था आदी १७ मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मांजरी येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी गेल्या आठ दिवसांपासून बेमुदत उपोषण करत आहेत. उपोषणकर्त्यां तीन विद्यार्थ्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सहायक आयुक्त सुदर्शन नागरे यांनी बुधवारी आंदोलनकर्त्यां विद्यार्थ्यांची भेट घेतली. विद्यार्थ्यांनी केलेल्या मागण्यांची पूर्तता कशाप्रकारे केली जाईल याचा अहवाल त्यांनी विद्यार्थ्यांसमोर सादर केला. पण अहवाल सकारात्मक नसल्याने विद्यार्थी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांची रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू होती. त्यामुळे बुधवारी आठव्या दिवशीही हे बेमुदत उपोषण कायम राहिले.

या वसतिगृहाला सोमवारी आदिवासी विभागाचे उपायुक्त एम. ए. शेख यांनी भेट दिली. मागण्यांची पूर्तता केली जाईल असे लेखी देण्याची तयारी त्यांनी दर्शवली.

पण कारवाई काय करणार याची स्पष्टता दिली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी उपोषण मागे घेणार नसल्याचे सांगितले. गेल्या आठवडय़ात प्रकल्प अधिकारी आयुष प्रसाद यांनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन समस्यांवर चर्चा केली होती आणि सर्व मागण्या मान्य केल्याचे तोंडी जाहीर केले होते. मागण्या मान्य केल्याचे लेखी द्यावे अशी विनंती विद्यार्थ्यांनी केली होती. मागण्या मान्य असल्याचे लेखी देण्यास त्यांनी नकार दिल्यामुळे मोठा गोंधळ झाला होता. विद्यार्थ्यांनी वारंवार विनंती करूनही प्रसाद ठाम राहिल्याने विद्यार्थ्यांनी उपोषण मागे घेण्यास नकार दिला. त्यानंतर प्रसाद आणि इतर अधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला होता.

प्रशासनाकडून वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जात नसल्याने या वसतिगृहात अनेक विद्यार्थी अनधिकृत रीत्या राहत आहेत. विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक सुविधा अपुऱ्या आहेत. तसेच शासनाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी होत नसून विद्यार्थ्यांनी त्या विरोधात आवाज उठवल्यावर विद्यार्थ्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जातात. मासिक निर्वाह भत्ता वेळेवर मिळत नाही. तसेच अभ्यासिकेमध्ये शैक्षणिक अभ्यासक्रमाची पुस्तके उपलब्ध नाहीत आणि माजी गृहपाल गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना त्रास दिला असल्याने तसेच विद्यार्थ्यांवर खोटे गुन्हे दाखल केल्याने त्यांचे निलंबन करावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.