पुणे-सोलापूर रस्त्यावरील मांजरी परिसरात रस्त्याच्या कडेला ट्रक लावणाऱ्या ट्रकचालकाविरुद्ध वाहतूक पोलिसांनी ट्रकच्या चाकाला जॅमर लावण्याची कारवाई केली, मात्र ट्रकचालकाने जॅमर तोडून पलायन केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाहतूक विभागाचे पोलीस शिपाई दीपक कांबळे यांनी या संदर्भात हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई कांबळे पुणे-सोलापूर रस्त्यावर वाहतूक नियमन करत होते. त्या वेळी ट्रकचालकाने रस्त्याच्या कडेला ट्रक उभा केला होता. त्यामुळे कांबळे यांनी ट्रकच्या चाकाला जॅमर लावला. काही वेळानंतर ट्रकचालक तेथे आला. त्याने चाकाला लावलेला जॅमर तोडला आणि ट्रक घेऊन तो पसार झाला. त्यानंतर पोलिसांनी ट्रकचालकाचा शोध सुरू केला. काही अंतरावर असलेल्या गोपाळपट्टी परिसरात ट्रक थांबल्याचे पोलिसांनी पाहिले, मात्र चालक तेथे नव्हता. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सम-विषम दिनांक न पाहता वाहनचालक रस्त्यावर वाहने लावतात. वाहतूक पोलिसांकडून अशा वाहनांच्या चाकांना जॅमर लावण्याची कारवाई करण्यात येते, मात्र काही वाहनचालक जॅमर तोडतात. एवढेच नव्हे तर जॅमर चोरून वाहनासह पसार होतात.