राज्यात स्वतंत्र तंत्रज्ञान विद्यापीठ करून सर्व अभियांत्रिकी महाविद्यालये त्याला संलग्न करण्याच्या शासनाच्या प्रयत्नांना आता गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विनाअनुदानित महाविद्यालयांच्या संस्थाचालकांनी तंत्रज्ञान विद्यापीठाशी संलग्न होण्यासाठी संमती दर्शवली आहे.
राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालये सध्या राज्याच्या विद्यापीठांशी संलग्न आहेत. राज्यात स्वतंत्र तंत्रशिक्षण विद्यापीठ निर्माण करण्याचा प्रस्ताव होता. त्यानुसार सर्व म्हणजे साधारण ३७० अभियांत्रिकी महाविद्यालये डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाला संलग्न करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. मात्र मुंबई, पुणे या ठिकाणी असलेल्या विद्यापीठांना असलेल्या प्रतिष्ठेमुळे संस्थाचालकांनी तंत्रज्ञान विद्यापीठाशी संलग्न होण्याच्या प्रस्तावाला विरोध केला होता. त्यामुळे तंत्रज्ञान विद्यापीठाशी संलग्न होणे ऐच्छिक करण्यात आले. मात्र आता राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालये एका विद्यापीठाशी संलग्न करण्याच्या प्रस्तावातील अडथळे दूर होण्याची शक्यता आहे.
राज्यात विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या संस्थाचालकांनी तंत्रज्ञान विद्यापीठाशी संलग्न होण्यास संमती दर्शवली आहे. संस्थाचालकांच्या ‘असोसिएशन ऑफ द मॅनेजमेंट ऑफ अनएडेड इंजिनीअरिंग कॉलेज’ या संघटनेने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत तंत्रज्ञान विद्यापीठाशी संलग्न होण्यासाठी संमती दर्शवली आहे. याबाबत संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. आर. पी. जोशी यांनी सांगितले,‘‘स्वतंत्र तंत्रज्ञान विद्यापीठ व्हावे याबाबत संघटनेनेच पूर्वीपासून मागणी केली होती. काही कारणास्तव अजून सर्व महाविद्यालये या विद्यापीठाशी संलग्न होऊ शकली नाहीत. मात्र संघटनेच्या बैठकीत तंत्रज्ञान विद्यापीठाशी संलग्न होण्यास महाविद्यालयांनी संमती दर्शवली आहे. मात्र अद्याप याबाबत ठराव झालेला नाही.’’
संग्रहित लेख, दिनांक 1st Jun 2016 रोजी प्रकाशित
तंत्रज्ञान विद्यापीठाशी संलग्न होण्यास संस्थाचालकांची संमती
राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालये सध्या राज्याच्या विद्यापीठांशी संलग्न आहेत.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 01-06-2016 at 01:02 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trustee members ready to affiliate with technology university