शिवसैनिकांमध्ये जल्लोष निश्चितपणे आहे. मात्र विधानसभा निवडणुकीत हा जल्लोष संघटित न झाल्यामुळे त्याचे रूपांतर मतांमध्ये झाले नाही. त्यामुळे पुण्यात एकही आमदार निवडून आला नाही. मात्र आता सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शिवसैनिकांनी कटिबद्ध झाले पाहिजे. तसे झाले तर सत्ता खूप लांब नाही, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी व्यक्त केला.
शिवसेना शहर शाखेतर्फे ठाकरे यांच्या उपस्थितीत ऋणानुबंध मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. जलसंपदा मंत्री विजय शिवतारे, खासदार शिवाजीराव आढळराव, श्रीरंग बारणे, पक्षप्रवक्त्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, संपर्क प्रमुख डॉ. अमोल कोल्हे, पक्षाचे सचिव आदेश बांदेकर, शहर प्रमुख विनायक निम्हण, उपनेते शशिकांत सुतार, शहर संघटक श्याम देशपांडे, सचिन तावरे तसेच शहर स्तरावरील पदाधिकारी आणि शिवसैनिकांची मोठी उपस्थिती यावेळी होती. शिवसेना हा पक्ष नाही तर हे एक कुटुंब आहे. त्यामुळे शिवसेना सोडून जे नेते वा शिवसैनिक जातात ते कधीच समाधानी राहू शकत नाहीत. त्यामुळेच शिवसेनेत घरवापसी सुरू झाली आहे, असे ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
शिवसैनिकांमध्ये जल्लोष असलाच पाहिजे. तसा तो आहे; पण विधानसभा निवडणुकीत त्या जल्लोषाचे रूपांतर मतांमध्ये होऊ शकले नाही. शिवसैनिकांमधील जल्लोष संघटित होऊ शकला नाही. त्यामुळे एकही आमदार निवडून येऊ शकला नाही. त्याची तमा न बाळगता सर्वसामान्यांची कामे करण्यासाठी आता शिवसैनिकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही ठाकरे यांनी केले. केवळ राज्यातच नाही, तर संपूर्ण देशात शिवसैनिकांचा आवाज घुमला आहे. हाच जल्लोष कायम ठेवला आणि संघटन कायम ठेवले, तर येत्या महापालिका निवडणुकीत पुणे महापालिकेवर निश्चितपणे भगवा फडकेल, असेही ते म्हणाले. विरोधात असताना सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसैनिक नेहमीच रस्त्यावर उतरला आहे. तेव्हा आपण विरोधात होतो. आता सत्तेत आहोत. निवडणुकीच्या प्रचारात जनतेला दिलेली आश्वासने आपल्याला पूर्ण करावी लागणार आहेत, असेही ठाकरे म्हणाले.