पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष तुकाराम मुंढे यांच्या बदलीस अवघा महिना झाला असताना एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात प्रशासनाला यश आले आहे. मुंढे यांच्या कार्यकाळात घेतले गेलेले निर्णय मागे घेण्यास भाजप पदाधिकारी आणि संघटना सरसावल्या आहेत. आज मुंढे यांच्या जागी रुजू झालेल्या नयना गुंडे यांच्या अध्यक्षतेखाली पीएमपीएमएलची बैठक पार पडली. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या पासची रक्कम कमी करण्यात आली आहे. पुण्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या महिन्याभराच्या बसच्या पासची किंमत ७०० रुपये होती. ही किंमत कमी करुन ती ५०० करण्यात आली आहे. महापौर मुक्ता टिळक यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

ज्येष्ठ नागरिकांच्या पासच्या किंमतीशिवाय या बैठकीत पीएमपीएमएलच्या सेवेबद्दल इतरही अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. पुणे शहरातील विविध पीएमपीच्या ऑफिसमधील तब्बल १५८ कर्मचाऱ्यांना तुकाराम मुंढे यांनी विविध कारणांवरुन निलंबित केले होते. तर मुंढे या पदावरुन जाताच नयना गुंडे यांची पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या लोकप्रतिनिधींनी भेट घेतली. या निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत रुजू करुन घ्यावे अशी विनंती गुंडे यांना करण्यात आली. यावरही आजच्या बैठकीत सकारत्मक चर्चा झाल्याचे टिळक यांनी सांगितले. या कर्मचारी वर्गाची कायद्यानुसार सुनावणी होऊन मगच त्यांना कामावर रुजू करायचे का नाही हा निर्णय घेतला जाईल. त्यामध्ये दोषी आढळलेल्यांवर कायद्यानुसार कारवाई होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

त्याचबरोबर मागील काही महिन्यापासून प्रत्यक्ष सेवेत दाखल न झालेल्या २०० मिडी बस खरेदी बाबतची प्रक्रियाही पुढे गेल्याचे सांगण्यात आले. यातील पहिल्या ५० बस येत्या महिन्याभरात दाखल होतील असे मुक्ता टिळक म्हणाल्या. ज्येष्ठ नागरिकांच्या बसच्या पासची किंमत कमी केल्याने त्याचा पीएमपीएमएलचे उत्पन्न वाढण्यावर चांगला परिणाम होईल अशी चर्चा आहे. त्यामुळे मुंढे यांच्या जाण्याने अनेक गोष्टींना वेगळे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.