नदीपात्राखालील बोगदा निर्मितीचे आव्हानात्मक काम पूर्ण

पुणे : भूमिगत मेट्रो मार्गिके साठी नदीपात्राखालून बोगदा निर्मितीचा आव्हानात्मक टप्पा पूर्ण झाला आहे. नदीच्या ८० मीटर रुंद पात्राखाली बोगदा करण्यात आला आहे. भुयारी मार्गिके चा आव्हानात्मक टप्पा पूर्ण झाल्यामुळे मेट्रोच्या कामांनाही वेग मिळणार आहे.

मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मेट्रो मार्गिके अंर्गत काम सुरू करण्यात आले आहे. या मार्गिके पैकी शेतकी महाविद्यालय ते स्वारगेट हा भुयारी मार्ग असून त्यासाठी बोगदा निर्मितीची प्रक्रिया महामेट्रोकडून सुरू करण्यात आली आहे. टनेल बोअरिंग मशिनद्वारे (टीबीएम) हे काम करण्यात येत आहे. या अंतर्गत शिवाजीनगर ते धान्य गोदामदरम्यानच्या १ हजार ६०० मीटरच्या दोन बोगद्यांचे काम यापूर्वीच पूर्ण करण्यात आले आहे. संपूर्ण मुठा नदीपात्र १५० मीटर रुंद असून नदीतील पाण्याचे पात्र ८० मीटर रुंद आहे.  सध्या मुठा नदीच्या तळापासून १३ मीटर खोलीवर टीबीएमद्वारे बोगदा निर्मिती करण्यात आली आहे, अशी माहिती महामेट्रोकडून देण्यात आली.

मेट्रो प्रकल्पाअंतर्गत शहरात वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या दोन मार्गिकांची कामे सुरू आहेत. सध्या दोन्ही मार्गिकांची मिळून ४० टक्क्यांपेक्षा जास्त कामे झाली आहेत. त्यामुळे हे दोन्ही मार्ग काही टप्प्यात सुरू करण्याचे नियोजन महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून करण्यात आले आहे. दोन मार्गिकांपैकी पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट ही मार्गिका पुण्यातील शेतकी महाविद्यालयापर्यंत उन्नत स्वरूपाची असून शेतकी महाविद्यालयापासून स्वारगटेपर्यंतचा मार्ग भूमिगत आहे.

भूमिगत मेट्रो मार्गिके ची लांबी ४.७४ किलोमीटर असून यामध्ये २.३७ किलोमीटर लांबीचे दोन बोगदे आहेत. फडके  हौद, मंडई, स्वारगेट येथे भूमिगत मेट्रो स्थानके  आहेत. सध्या कृषी महाविद्यालयापासून शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयापर्यंतच्या दोन्ही बाजूंच्या बोगदा निर्मितीचे काम पूर्ण झाले आहे. तर स्वारगेटच्या बाजूने भूमिगत मेट्रो मार्गिके चे काम प्रगतिपथावर आहे.

मजुरांची कमरता

करोना संसर्गामुळे मेट्रो मार्गिकांची कामे करताना महामेट्रोला मजुरांची कमरता जाणवत आहे. संसर्गात वाढ झाल्यामुळे महामेट्रोकडे काम करणारे अनेक मजूर मूळ गावी परतले आहेत. जवळपास ३ हजार मजूर मूळ गावी परतले असतानाही दोन महिन्यात महामेट्रोकडून नदीपात्राखालील बोगदा निर्मितीचा आव्हानात्मक टप्पा पूर्ण करण्यात आला आहे.