अन्नधान्य पुरवठा विभागाकडे डाळ पडून;
शिल्लक तूरडाळीने पुरवठा विभागापुढे समस्या
शिधापत्रिकेवर मिळणाऱ्या तूरडाळीचे दर खुल्या बाजारात मिळणाऱ्या डाळीपेक्षाही अधिक झाले असल्याने मागणीअभावी मोठय़ा प्रमाणावर डाळ पडून असल्याचे स्पष्ट झाले आहे. या डाळीचे आता करायचे काय, असा प्रश्न जिल्हा पुरवठा विभागापुढे निर्माण झाला आहे.
काही दिवसांपूर्वी तूरडाळीचे भाव मोठय़ा प्रमाणावर वाढल्याने ही डाळ सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली होती. त्यावरून सरकारवर आरोप-प्रत्यारोपही करण्यात येत होते. वाढलेले भाव लक्षात घेता शासनाच्या अन्नधान्य पुरवठा विभागाने त्या वेळी बाजारभावापेक्षाही कमी दरात तूरडाळ उपलब्ध करून दिली होती.
जुलै व ऑगस्ट महिन्यात स्वस्त तूर डाळीचे शिधापत्रिकेबरोबरच इतर काही ठिकाणाहून वितरण सुरू करण्यात आले होते.
तूरडाळीच्या या साठय़ाचे आता काय करायचे, अशी समस्या अन्नधान्य पुरवठा विभागापुढे निर्माण झाली आहे.
याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी दिनेश भालेदार यांनी सांगितले की, बाजारातील भावापेक्षा शिधापत्रिकेवरील तूरडाळीचे भाव कमी झाल्याने तूरडाळ शिल्लक आहे. शिल्लक राहिलेल्या डाळीबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
मागणी नाही
दरम्यानच्या काळात खुल्या बाजारात तूर डाळीचे भाव शिधापत्रिकेवरील डाळीपेक्षा कमी झाले. त्याचा परिणाम शिधापत्रिकेवर उपलब्ध असणाऱ्या डाळीवर झाला. या डाळीची मागणी अचानक कमी झाली. अंत्योदय योजना व दारिद्रय रेषेखालील शिधापत्रिका धारकांसाठी अन्नधान्य पुरवठा विभागाकडे पावणे दोन हजार टनांहून अधिक तूरडाळ उपलब्ध झाली होती. बाजारात तूरडाळीचे भाव चढे असताना ही स्वस्तातील तूरडाळ नागरिकांनी घेतली. मात्र, बाजारात भाव कमी झाल्यानंतर मागणी थांबल्याने त्यातील काही तूरडाळ पडून आहे.