अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावरचा मानहानीचा दावा मागे घेतला आहे. गिरीश बापट यांनी नवाब मलिक यांच्या विरोधात पुण्याच्या प्रथम वर्ग न्यायालयात फौजदारी दावा दाखल केला होता. वर्षभर हा खटला सुरु होता. मात्र या खटल्याच्या सुनावणीसाठी गिरीश बापट उपस्थित राहू शकत नव्हते. त्याच पार्श्वभूमीवर बापट यांनी स्वतःहून हा दावा मागे घेतला. बापट यांनी दावा मागे घेतला असला तरीही तूरडाळ गैरव्यवहाराबाबत त्यांच्यावरचे आरोप आजही कायम असल्याचे मलिक यांनी म्हटले आहे.

तूरडाळ गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी गिरीश बापट यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला. बापट यांनी तूरडाळीवरचे निर्बंध शिथील केले ज्यामुळे दरवाढ झाली आणि जवळपास २ हजार कोटींचा घोटाळा झाला असा आरोप मलिक यांनी केला होता. यानंतर गिरीश बापट यांनी नवाब मलिक यांच्या विरोधात मानहानीचा दावा केला होता जो आता मागे घेण्यात आला आहे.