पाच आणि ५० रुपयांच्या नोटा ‘दुर्मीळ’

किरकोळ बाजारातील चलनामध्ये शहरात गेल्या काही दिवसांमध्ये वीस रुपयांच्या नोटांची संख्या वाढली असल्याने सध्या या नोटांचा बोलबाला आहे. दुसरीकडे पाच रुपयांची नोटा गायब झाल्याचे चित्र असून, पन्नास रुपयांच्या नोटांची संख्याही कमी असल्याने या नोटा जणू दुर्मीळ झाल्या आहेत. या प्रकारामुळे किरकोळ बाजारात सुटे पैसे देण्याबाबत अडचणी निर्माण होत असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

पाचशे आणि हजारांच्या नोट व्यवहारातून रद्द करण्यात आल्यानंतर दोन हजार आणि पाचशेच्या नव्या नोटा चलनात आणण्यात आल्या. सुरुवातीच्या काळात या नोटांची प्रचंड टंचाई जाणवत होती. त्यामुळे व्यवहाराचा संपूर्ण भर शंभर रुपयाच्या नोटेवर आला होता. आता दोन हजार किंवा पाचशेच्या नोटा व्यवहारात स्थिरावल्या आहेत. त्यांची कमतरता भासत नाही. मोठय़ा व्यवहारामध्ये नव्या नोटांची संख्या पुरेशी आहे. मात्र, किरकोळ व्यवहारामध्ये छोटय़ा नोटांबाबत सध्या वेगळेच चित्र दिसते आहे.

वीस रुपयांच्या नोटांची संख्या मागील काही दिवसांपासून व्यवहारामध्ये अचानकपणे वाढली आहे. त्यात वीसच्या जुन्या नोटा तर आहेतच, पण २०१७ मध्ये आलेल्या नोटांची संख्या सर्वाधिक असल्याचे दिसून येते. दुसरीकडे पाच रुपये आणि पन्नास रुपयांच्या नोटांची संख्या कमी झाली आहे. पाच आणि पन्नास रुपयांच्या नव्या नोटा अभावानेच दिसून येतात. दोन्ही प्रकारच्या   जीर्ण झालेल्या नोटा सध्या व्यवहारात आहेत. अनेकांकडून या नोटा नाकारल्या जात असल्याने व्यावसायिकांना अडचणी निर्माण होतात.नोटांबाबत एका चहा विक्रेत्याने सांगितले, तीस किंवा चाळीस रुपये बिल झालेल्या ग्राहकाने शंभर रुपये दिल्यास पन्नास रुपयांची एक नोट आणि इतर दहा आणि वीस रुपयांची नोट परत देऊन व्यवहार केला जात होता. मात्र, पन्नास रुपयांच्या नोटा चलनात कमी प्रमाणात आहेत. त्या उलट वीस रुपयांच्या नोटा मोठय़ा संख्येने आहेत. त्यामुळे पन्नासऐवजी वीस आणि दहा रुपयांच्या नोटा ग्राहकाला परत देऊन व्यवहार पूर्ण केला जातो.

दोनशे रुपयांची नवी नोट कुठे?

दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या नव्या नोटांनंतर रिझव्‍‌र्ह बँकेने दोनशे रुपयांची नवी नोटही व्यवहारात आणली आहे. त्यापाठोपाठ पन्नास रुपयांची नवी नोटही जाहीर करण्यात आली. मात्र, या दोन्ही नोटा प्रत्यक्ष व्यवहारात कुठेच दिसत नसल्याचे चित्र आहे. मुळातच या नोटांची संख्या बँकामध्येही कमी आहे. त्याचप्रमाणे दोनशे रुपयांची नोट ठेवण्यासाठी एटीएम यंत्रामध्ये स्वतंत्र ट्रे अद्यापही देण्यात आला नाही. त्यामुळे एटीएमच्या माध्यमातूनही दोनशे रुपयाची नोट मिळत नाही. बँकेतून या नोटा मिळत असल्या, तरी नव्या नोटांच्या कुतूहलापोटी त्या जपून ठेवण्याकडेच अनेकांचा कल आहे. त्यामुळे व्यवहारात अद्याप पुरेशा नोटा येऊ शकल्या नसल्याचे जाणकारांकडून सांगण्यात आले.