पिंपरी पोलीस कोठडीत असलेल्या दोन आरोपींनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. ही घटना आज उघडकीस आली असून आत्महत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविंद्र भागवत सातपुते (वय-२७) आणि सुमित गोवर्धन बेरड (वय-२२) अशी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. या दोघांना पोलिसांकडे खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. दोन्ही आरोपींचा हात रक्तबंबाळ झाला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविंद्र आणि सुमित या दोघांनी वाहतूक पोलिसांकडे खंडणी मागितली होती. या प्रकरणी त्यांना पिंपरी पोलिसांनी अटक केली, त्यांना न्यायालायने पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानुसार आरोपीना पिंपरी पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले. दरम्यान, रविवारी दुपारी जीन्स पॅन्ट चे धातूचे बक्कल काढून या दोघांनी हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. दोघांचे हात रक्तबंबाळ झाले होते. हा सगळा प्रकार पहारेकऱ्याने पाहिला. ज्यानंतर दोन्ही आरोपींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. आपण आत्महत्येचा प्रयत्न केला तर नंतर पोलीस सोडून देतील या उद्देशाने दोघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक निमगिरी यांनी दिली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांनी पिंपरी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रवींद्र आणि सुमित यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.